खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना विद्यार्थ्यांचा 'बायबाय'! जिल्हा परिषदेच्या शाळांना पसंती

school students.jpg
school students.jpg

नाशिक / वणी : अध्ययन - अध्यापनात तंत्रज्ञानाची जोड, नाविन्यपूर्णता, शिक्षकांचे  उल्लेखनीय कर्तृत्व, उपक्रमशीलतेतून वाढलेली शाळांची लोकप्रियता आणि गुणवत्ता यामुळे गावोगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे.

विद्यार्थ्यांचा खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना 'बायबाय'

याच बदलामुळे दिंडोरी  तालुक्यातील २०० च्या वर विद्यार्थ्यांनी खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना बायबाय करत तालुक्यातील  विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद आहेत. तथापि 'शाळा बंद -शिक्षण सुरु ' या उपक्रमांतर्गत दिंडोरी तालुक्यातील शिक्षक वर्गाने नाविन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवले आहे. विविध माध्यमांचा वापर करुन खेड्या - पाड्यातील तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षक पोहचत आहेत.

सातत्यपूर्ण सराव व दृढीकरणावर भर
यामध्ये प्रामुख्याने प्रत्यक्ष गृहभेटी, गावातील मोकळ्या जागेचा वापर, गल्लीमित्र, मोबाइलद्वारे व जाणकार पालकांच्या मदतीने अभ्यास घेतला जात आहे. गाव तेथे वाचनालय, डोनेट अ डिव्हाईस, तंत्रसेतू, टिलीमिली व विद्यावाहिनी सारख्या रेडीओ कार्यक्रमांची मदत घेतली जात आहे. शिक्षकांनी स्वखर्चाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्याना स्वाध्यायपुस्तिका उपलब्ध करुन दिल्याने सातत्यपूर्ण सराव व दृढीकरणावर भर दिला जात आहे.

विद्यार्थी व पालक जिल्हा परिषद शाळांकडे आकर्षित
जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलून अध्यापनाचा दर्जा उंचावल्याने पालकांचा दृष्टिकोन बदलला असून, नव्या दमाच्या शिक्षकांना जुन्या अनुभवी शिक्षकांच्या अनुभवाची दुहेरी जोड मिळाल्याने परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, ज्ञान रचनावादाचा उपयोग, डिजिटल शाळा, आयएसओ प्रमाणपत्र दर्जा, प्रगत उपक्रमशीलतेमुळे इंग्रजी तसेच खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा हव्या हव्याशा वाटत आहेत. इंग्रजी माध्यमापेक्षाही दर्जेदार शिक्षण मोफत मिळू लागल्याने विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे आकर्षित होत आहेत. जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी देखील आपले विद्यार्थी गुणवंत व्हायला हवेत याहेतूने स्वतःमध्ये अमुलाग्र बदल केले आहेत.

जिल्हा परिषद शाळांचे नवे पर्व सुरू
विशेष म्हणजे शासनाकडून अत्यल्प मदत  मिळत असतांना पालकांबरोबर तसेच दानशूर व्यक्तिंशी संबंध दृढ करत शाळांमध्ये भौतिक सुविधांबरोबरच डिजिटल साहित्य खरेदीपर्यत उल्लेखनीय लोकसहभाग मिळवला आहे. त्यामुळे तालुक्यात जिल्हा परिषद शाळांचे नवे पर्व सुरू झाल्याचे दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या चार महिन्यांचा शाळा बंद कालावधी असून सुद्धा खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून ९४ व खाजगी मराठी माध्यमाच्या शाळेतून १०९ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. 

 शाळा बंद कालावधीत विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया सुरु ठेण्यासाठी शिक्षकांची तळमळ व सकारात्मक प्रयत्न यशस्वी ठरलेले आहेत. शिक्षकांचे हे प्रयत्न पालक वर्गास दिसून आल्याने त्यांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या  शाळेत घेतलेला आहे. -बी. डी. कनोज (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती दिंडोरी)
 

माझी कन्या खाजगी शाळेत शिक्षण घेत होती. परंतू भरपूर पैसे खर्च करूनही अपेक्षित गुणवत्ता दिसून न आल्याने व आमच्या वनारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तुलनेने चांगली असल्याने मी आमच्या गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. - संपत ठाकरे (पालक, वनारवाडी)

कोवीड १९ च्या संकटावर मात करत आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमराळे बु. या शाळेतील शिक्षकांच्या ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून ३२ विद्यार्थी दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मुलांसाठी घेतलेली मेहनत व शाळेची वाढलेली गुणवत्ता त्यामुळे माझे २ मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दाखल केली आहेत.  - भारत धात्रक, (पालक, उमराळे बु.)

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com