Motivational Story : अपयशाच्या आठ पायऱ्या चढत अखेर पंकजने यशाला गाठलेच; होणार वैमानिक

अरुण मलाणी
Sunday, 24 January 2021

अठरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर पंकज हा भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर पदावर वैमानिक म्‍हणून रुजू होताना आकाश काबीज करणार आहे. भारतीय हवाई दलात वैमानिक बनण्याचे स्वप्न त्‍याने साकारले असून, आजवरचा त्‍याचा प्रवास खडतर व तितकाच प्रेरणादायी राहिला आहे. 

नाशिक : आयुष्यात येणाऱ्या अपयशाच्‍या प्रसंगांचा हिमतीने सामना करत, प्रत्‍येक प्रसंगातून शिकवण घेताना आपल्‍या कमतरता दूर करत ध्येयपूर्ती करता येते हे नाशिकच्‍या पंकज जांगरा या युवकाने सप्रमाण सिद्ध केले आहे. तब्‍बल आठ वेळा आलेल्‍या अपयशानंतर नवव्या प्रयत्‍नात त्‍याने यश मिळविले. तो आता भारतीय हवाई दलात वैमानिक म्‍हणून दाखल होणार आहे. थक्‍क करणारा त्‍याचा जीवनप्रवास प्रत्‍येक युवकांसाठी प्रेरणादायी असाच आहे. 

अपयशावर मात करत पंकजची गगनभरारी 

पंकजने अपयशातून खचून न जाता जिद्दीच्‍या जोरावर यशाला गवसणी घातली. येत्या २८ जानेवारीला तो हैदराबादमधील डुंडीगल येथील इंडियन एअर फोर्स ॲकॅडमीत वैमानिक प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे. अठरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर पंकज हा भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर पदावर वैमानिक म्‍हणून रुजू होताना आकाश काबीज करणार आहे. भारतीय हवाई दलात वैमानिक बनण्याचे स्वप्न त्‍याने साकारले असून, आजवरचा त्‍याचा प्रवास खडतर व तितकाच प्रेरणादायी राहिला आहे. 

चुकांमधून शिकून जोमाने तयारी 

शालेय जीवनापासूनच पंकजची वैमानिक बनण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने बारावीत असताना एनडीएची परीक्षादेखील दिली मात्र, यश मिळाले नाही. त्यानंतर अभियांत्रिकीच्या अभ्यासासोबतच त्याने एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट तसेच कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन या परीक्षांची तयारी सुरू केली. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होऊन तो मुलाखतीपर्यंत पोचला. मात्र, अपयश आले. अशाप्रकारे सलग आठ वेळा तो मुलाखतीत अपयशी ठरला. परंतु, प्रत्येक वेळी झालेल्या चुकांमधून शिकून तो अधिक जोमाने तयारी करत होता. नवव्या प्रयत्नात मात्र त्याने स्वतःला सिद्ध केले आणि गुजरातमधील गांधीनगर येथून एअर फोर्स सिलेक्शन बोर्डमधून मुलाखत उत्तीर्ण झाला. 

ट्रेकिंगचा छंद

पंकज नाशिकमधील काठे गल्ली येथील रहिवासी असून, त्याचे शालेय शिक्षण गुरू गोविंदसिंग पब्लिक स्कूलमधून झाले आहे. तर बारावीचे शिक्षण आरवायके महाविद्यालयातून झाले. त्यानंतर त्याने अभियांत्रिकीचे शिक्षणही पूर्ण केले. एनडीए तसेच त्यानंतरच्या परीक्षा आणि मुलाखतीसाठी त्याला सुदर्शन ॲकॅडमीच्या हर्षल आहेरराव यांचे मार्गदर्शन लाभले. पंकजचे वडील सुभाष जांगरा यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून, आई भागवती जांगरा गृहिणी आहेत. पंकजने अभ्यासाबरोबरच ट्रेकिंग आणि वाचनाचा छंदही जोपासला आहे. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

प्रेरणादायी यश 

पंकजच्या यशाबद्दल त्याचे मार्गदर्शक सुदर्शन ॲकॅडमीचे हर्षल आहेरराव म्हणाले, की पंकजची भारतीय हवाई दलात निवड ही संपूर्ण नाशिकसाठी अभिमानाची बाब असून, त्याचा जिद्दीचा हा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success in ninth attempt for service in Air Force nashik marathi news