भोकणी सोसायटी अध्यक्षाची आत्महत्या; जिल्हा बँकेत चेक वटत नसल्याने तणाव असल्याची माहिती

अजित देसाई
Thursday, 1 October 2020

सानप यांच्यावर देना बँकेचे सात लाख रुपयांचे कर्ज थकीत असून सोसायटी चेअरमन या नात्याने सभासदांना कर्ज वितरण करताना देण्यात आलेले धनादेश जिल्हा बँकेत वटत नसल्याने काही दिवसांपासून ते सतत तणावाखाली असल्याचे ग्रामस्थ व नातेवाईकांचे म्हणणे आहे.

सिन्नर (नाशिक) : तालुक्यातील भोकणी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष सोमनाथ कृष्णा सानप (55) यांनी आपल्या पडीत घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (ता.१) पहाटे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 

देना बँकेचे 7 लाख वैयक्तिक कर्ज;

सानप यांच्यावर देना बँकेचे सात लाख रुपयांचे कर्ज थकीत असून सोसायटी चेअरमन या नात्याने सभासदांना कर्ज वितरण करताना देण्यात आलेले धनादेश जिल्हा बँकेत वटत नसल्याने काही दिवसांपासून ते सतत तणावाखाली असल्याचे ग्रामस्थ व नातेवाईकांचे म्हणणे आहे.

खिडकीतून वडिलांचा लटकणारा मृतदेह
भोकणी गावापासून काही अंतरावर खांबाळे रस्त्यालगत असणार्‍या सानप वस्ती वर हा प्रकार घडला. मध्यरात्रीच्या सुमारास सानप यांनी जुन्या कौलारू घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असावी. सकाळी मुलगा सतीश हा जनावरांना चारा टाकण्यासाठी उठला असतांना घराच्या खिडकीतून त्याला वडिलांचा लटकणारा मृतदेह दिसून आला. त्याने मोठ्याने हंबरडा फोडत कुटुंबीयांना व आजूबाजूच्या वस्तीवरील रहिवाशांना मदतीसाठी बोलावले. बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ यांच्यासह ग्रामस्थांनी  घटना समजतात सानप वस्तीकडे धाव घेतली. वाघ यांनी वावी पोलीस ठाण्यात संपर्क साधत घटनेची माहिती दिली. सहायक निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या सूचनेवरून हवालदार संदीप शिंदे पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला. मयत सानप यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

जिल्हा बँकेकडून कर्ज वाटप होत नसल्याने तणावात 
दरम्यान, सानप यांच्यावर सिन्नर येथील देना बँकेच्या शाखेचे सात लाख रुपयांचे कर्ज असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. या कर्जाच्या परतफेडीची मुदत संपून गेल्याने ते गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. त्यातच स्थानिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणून सभासदांना कर्ज वाटप करताना त्यांनी जिल्हा बँकेच्या सूचनेप्रमाणे धनादेश वाटप केले होते. त्यापैकी काही धनादेश बँकेत वटत नसल्याने सभासद सानप यांच्याकडे हेलपाटे मारत होते. त्या तणावातून देखील त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे अशी चर्चा आहे.

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

धनादेश तांत्रिक अडचणीमुळे वटले नसावेत

तर या संदर्भात नाशिक जिल्हा बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता भोकणी सोसायटीच्या 45 सभासदांना सुमारे 20 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती मिळाली. सोसायटीच्या सात ते दहा सभासदांचे धनादेश तांत्रिक अडचणीमुळे वटले नसावेत असेही या अधिकाऱ्याने सांगितले. जिल्हा बँकेने यंदा 437 कोटींच्या वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सिन्नर तालुक्यात 14 कोटींचे उद्दिष्ट असताना 19 कोटींचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले आहे. कर्ज वाटप करताना निकषात न बसणाऱ्या सभासदांना लाभ देण्यात आला नाही. तसेच बँकेच्या शाखेत रक्कम शिल्लक नसेल तर अशी प्रकरणे प्रलंबित असावीत याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले..

हेही वाचा >  मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of Bhokani Society President sinner nashik marathi news