VIDEO : "बॉंबस्फोटासह अन्य कारणांनी मालेगावचे नेहमी चर्चेत...पण यंदाचे संकटच वेगळे!"

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 30 May 2020

"मालेगाव राज्यातील दुर्मिळ शहर आहे. संपूर्ण राज्यात कोणत्याही शहराशी मालेगावची तुलना होऊ शकत नाही. संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगावात जातीय ताणतणावही नेहमीच राहिलेला आहे;"

नाशिक : लोकसंख्येची मालेगाव इतकी घनता मुंबई वगळता अन्यत्र कुठेही नाही. त्यात पॉवरलूम बंद झाल्याने दहा बाय दहाच्या खोलीत 20 लोक थांबले. बॉंबस्फोटासह अन्य कारणांनी मालेगावचे नाव यापूर्वीही नेहमी चर्चेत राहिले; परंतु यंदाचे संकट वेगळेच होते. मालेगावची परिस्थिती दुर्मिळ व हाताळणे तितकेच आव्हानात्मक होते, असे मत पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी "सकाळ'शी संवाद साधताना व्यक्त केले. 

पोलिसांची भूमिका ठरली महत्त्वाची - पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह
डॉ. सिंह म्हणाल्या, की मालेगाव राज्यातील दुर्मिळ शहर आहे. संपूर्ण राज्यात कोणत्याही शहराशी मालेगावची तुलना होऊ शकत नाही. संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगावात जातीय ताणतणावही नेहमीच राहिलेला आहे; परंतु कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्‍यक असताना येथील परिस्थिती पूर्णपणे विपरीत होती. मुंबईप्रमाणे मालेगावमध्येही लोकसंख्येची घनता अधिक आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 18 हजार 800 लोक प्रतिस्क्‍वेअर किलोमीटर अशी घनता असल्याने दहा बाय दहाच्या घरात 20-22 लोकांना कोंबून ठेवण्याचे आव्हान होते. त्यात जमावाच्या मानसिकतेत बदल घडविणे कठीण होते. दुसरीकडे मनुष्यबळ मर्यादित असताना संवेदनशीलता चारपट होती. योग्य हाताळणीमुळेच परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. 

म्हणून पोलिसही बाधित 
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक पॉइंटवर 12 ते 15 पोलिस जवान तैनात होते. मर्यादित मनुष्यबळ असल्याने अन्य ठिकाणांहून पोलिस जवानांची सहाय्यता घेतली. कामानिमित्त, राहण्याच्या ठिकाणी पोलिस एकत्र येत असल्याने, प्रतिबंधित क्षेत्रात चार पोलिस ठाणी असल्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पोलिसांचा रुग्णांशी संबंध येत होता. त्यामुळे पोलिसही कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे सांगून सध्या पॉइंटवरील तैनातीत सुधारणा केल्याचेही डॉ. सिंह यांनी स्पष्ट केले. 

विनाकामाचे लोक परतविले 
नाशिक जिल्ह्यालगत राज्यातील अन्य जिल्ह्यांसह गुजरातमधील जिल्ह्यांच्याही सीमा आहेत. त्यामुळे मुंबईहून येणारे स्थलांतरित इगतपुरीमार्गे, तर पुण्याहून सिन्नरमार्गे दाखल होत होते. या गर्दीला नियंत्रणात आणण्याचे काम पोलिसांनी केले. ज्यांच्याकडे पास नव्हते, नाशिकला येण्याचे ठोस कारण नव्हते, त्यांना माघारी पाठविले. चार हजारांहून अधिक लोकांवर कारवाई केली, प्रसंगी वाहनजप्तीही केली. 

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आक्रोश
 
चाळीस दिवस तळ ठोकून 

नाशिकमध्ये बसून आव्हानांना तोंड देणे शक्‍य नव्हते. त्यामुळे गेले 40 दिवस मालेगावमध्ये थांबत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. कर्मचारी त्यांच्या नेतृत्वाकडे बघून प्रोत्साहित होत असतात. याची जाणीव ठेवत संचलनासह प्रत्येक टप्प्यावर त्यांना प्रोत्साहित करण्यावर भर दिला. वैयक्‍तिक कुटुंबाप्रमाणे पोलिस दलदेखील कुटुंबासारखेच आहे. नेहमी डोळ्यांपुढे असलेली आई दिसत नाही म्हणून चारवर्षीय मुलगी सारखी फोन करत होती. दुसरीकडे मालेगावला कर्तव्य बजावताना कुटुंबातील पोलिस जवानांना प्रोत्साहित करणे अशा दोन्ही भूमिका निभवाव्या लागल्या, असे त्यांनी नमूद केले. 

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superintendent of Police Dr. Aarti Singh interview about malegaon situation nashik marathi news