"माझ्या सासूशी फोनवर बोला अन् बायकोला नांदायला पाठवा"..तिने नकार देताच..

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

अरुणा कापसे यांच्या बंगल्यातील आउटहाउसमध्ये आरोपी अरविंद व त्याची पत्नी त्रिशाला राहात होते. आरोपीची पत्नी त्रिशाला कापसे यांच्याकडे घरकामही करायची. आरोपी अरविंद दारू पिऊन त्याची पत्नी त्रिशाला हिला नेहमी मारहाण करायचा. त्यावरून अरुणा कापसे यांनी आरोपीला अनेकदा समजावून सांगितले.

नाशिक : घरमालकिणीच्या अंगावर ब्लेडने वार करून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पोबारा करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी व 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अरविंद लाटे (30, रा. साईबाबा मंदिराजवळ इंदिरानगर, टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. 

असा घडला प्रकार

अरुणा कापसे (रा. साईकृपा, अश्‍विननगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या बंगल्यातील आउटहाउसमध्ये आरोपी अरविंद व त्याची पत्नी त्रिशाला राहात होते. आरोपीची पत्नी त्रिशाला कापसे यांच्याकडे घरकामही करायची. आरोपी अरविंद दारू पिऊन त्याची पत्नी त्रिशाला हिला नेहमी मारहाण करायचा. त्यावरून अरुणा कापसे यांनी आरोपीला अनेकदा समजावून सांगितले. मात्र आरोपीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी त्रिशाला माहेरी निघून गेली होती. 17 ऑक्‍टोबर 2016 ला कापसे घरात एकट्या असताना दुपारी बाराच्या सुमारास आरोपी अरविंद तेथे आला आणि  कापसे यांना, "माझ्या सासूशी फोनवर बोला व माझ्या बायकोला नांदण्यासाठी पाठवा असे सांगा,' असे म्हणाला. श्रीमती कापसे यांनी नकार दिला. त्याचा राग येऊन आरोपी अरविंद लाटे याने ब्लेडने  कापसे यांच्या चेहऱ्यावर, कमरेवर, मानेवर वार केले. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावले. यात त्याच्या हाती अर्धवट तुटल्याने मंगळसूत्र घेऊन तो पळाला. श्रीमती कापसे यांनी आरडाओरड केल्याने नागरिक मदतीला धावले. पळून जाणारा आरोपी अरविंद यास वाहतूक पोलिसाने तुटलेल्या मंगळसूत्रासह अटक केली होती. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा > VIDEO : ह्रदयद्रावक! पतंगामागे धावत होता चिमुकला...ऐन मकरसंक्रांतीलाच आक्रोश..

चार वर्षांची सक्तमजुरी

तत्कालीन उपनिरीक्षक टी. ए. चव्हाण यांनी गुन्ह्याचा तपास करीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायालयाचे प्रधान जिल्हा न्यायाधीश अभय वागवसे यांच्यासमोर चालले. सरकारी पक्षातर्फे ऍड. शिरीष कडवे यांनी कामकाज पाहताना नऊ साक्षीदार तपासले. वाहतूक पोलिस साक्षीदार कमलेश आवारे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पुराव्यानिशी आरोप सिद्ध झाल्याने न्या. वाघवसे यांनी आरोपी अरविंद लाटे यास चार वर्षांची सक्तमजुरी, 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची भोगावी लागणार आहे. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक संतोष गोसावी, पोलिस शिपाई सी. एम. सुळे यांनी पाठपुरावा केला.  

हेही बघा > PHOTO : धक्कादायक! यात्रेत चिमुरडी अचानक गायब...शोध घेतल्यावर धक्काच!

हेही वाचा > लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspect attacked woman Four years punishment Nashik Crime Marathi News