मुलीच्या उपचारासाठी 'तो' आला होता...शेवटी मोबाईल लोकेशनने पोलीसांनी..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

औरंगाबाद पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यांच्या गुन्हे शोध पथकाच्या गुप्त बातमीदाराने संशयित नाशिकमध्ये असल्याची माहिती दिली. त्याच्या मोबाईल लोकेशनवरूनही नाशिक येथील गंजमाळ भागाची माहिती प्राप्त झाली.

नाशिक : औरंगाबाद येथे घरफोडी करून 80 तोळे सोने लुटणाऱ्या संशयितास भद्रकाली पोलिस आणि औरंगाबादच्या गुन्हे पथकाने येथील जिल्हा रुग्णालयातून अटक केली. दीड महिन्यापासून तो नाशिकमध्ये वास्तव्यास होता. संशयित सराईत असून, त्याच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 

औरंगाबादचा सराईत नाशिकमध्ये भेटला..

शंकर जाधव (वय 36, रा. मोहंमदिया कॉम्प्लेक्‍स, औरंगाबाद) असे संशयिताचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने औरंगाबाद येथे घरफोडी करत 80 तोळे सोने लंपास केले होते. औरंगाबाद पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यांच्या गुन्हे शोध पथकाच्या गुप्त बातमीदाराने संशयित नाशिकमध्ये असल्याची माहिती दिली. त्याच्या मोबाईल लोकेशनवरूनही नाशिक येथील गंजमाळ भागाची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सोमवारी (ता. 20) सकाळी औरंगाबाद गुन्हे शोध पथक शहरात दाखल झाले. त्यांनी भद्रकाली पोलिसांशी संपर्क केला. भद्रकाली पोलिसांनी बातमीदारामार्फत संशयिताचा शोध घेतला. तो गंजमाळ येथील पंचशीलनगरमध्ये राहत असल्याचे समजले.

घरफोडी प्रकरणात पोलिस मागावर 

भद्रकाली पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार दत्तू ढोली, किशोर बेंडकुळे, बीट मार्शल सुधीर चव्हाण, संजय गवांदे, औरंगाबाद गुन्हे पथकाचे राजेंद्र भरमळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचशीलनगर येथे जाऊन चौकशी केली असता, संशयित तेथेच राहत असून, मुलीच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात गेल्याचे समजले. पोलिसांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठत संशयित शंकर जाधव याला दुपारी बाराच्या सुमारास अटक केली. त्याच्या मुलीच्या पायाचे प्लॅस्टर काढण्यासाठी तो रुग्णालयात गेला होता. दुपारी एकच्या सुमारास पथक त्याला घेऊन औरंगाबादकडे रवाना झाले. 

हेही वाचा>  लघुशंकेसाठी थांबणे असे महागात पडले की..

संशयित घरफोडी सराईत 
संशयित शंकर जाधव हा नेहमी खिडकीच्या माध्यमातून घरफोडी करत असे. खिडकीचे गज काढून किंवा खिडकी तोडून तो चोरी करत होता. त्याच्याविरुद्ध औरंगाबाद पोलिसांत अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यात त्याने लाखोंचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर दीड महिन्यापूर्वी गंजमाळ येथील पंचशीलनगरमध्ये वास्तव्यास आला होता.  

हेही वाचा> "ते" नकळत व्हायरल करायचे पोर्नोग्राफी व्हिडिओ...अचानक..​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspected of Burglary arrested by Nashik Police Crime Marathi News