पाचशेच्या खोट्या नोटा देऊन वृद्धाला गंडा; कॅश काउंटरवर झाला खुलासा

युनूस शेख
Friday, 11 September 2020

त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून शिनकर कॅश काउंटरवर नोटा बदलण्यासाठी गेले. त्यादरम्यान संशयितांनी हातचालाखीने रक्कम काढून घेतली. उर्वरित रक्कम वृद्धास देत तेथून निघून गेले

नाशिक : पाचशेच्या दोन नोटा खोट्या असल्याचा बनाव करत दोन संशयितांनी वृद्धाकडील १७ हजारांची रक्कम लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी (ता.१०) दुपारी अडीचच्या सुमारास घडला. याबाबत भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

असा घडला प्रकार

क्रांतिनगर (मखमलाबाद रोड) येथील पोपटराव शिनकर (वय ७४) गुरुवारी (ता. १०) शालिमार भागातील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत खात्यातील रक्कम काढण्यासाठी गेले. कॅश काउंटरवरून त्यांनी ४० हजारांची रक्कम काढली. बॅंकेत पूर्वीपासूनच हजर असलेल्या दोन संशयितांनी रक्कम मोजून देतो, असे म्हणत त्यांच्याकडील ४० हजार ताब्यात घेतले. रक्कम मोजताना संशयितांनी दोन पाचशेच्या नोटा काढून वृद्धाच्या हातात दिल्या. या दोन्ही नोटा खोट्या असल्याचे सांगत त्या बदलून घेण्यास सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून शिनकर कॅश काउंटरवर नोटा बदलण्यासाठी गेले. त्यादरम्यान संशयितांनी हातचालाखीने ४० हजारांच्या रकमेतून १७ हजार ५०० ची रक्कम काढून घेतली. उर्वरित रक्कम वृद्धास देत तेथून निघून गेले. त्यांनी रक्कम मोजल्यानंतर १७ हजार ५०० रुपये कमी असल्याचे आढळले. त्यांनी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना माहिती देत भद्रकाली पोलिसांत घडलेला प्रकार सांगितला.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspected fraud to old man nashik marathi news