मक्यासह ज्वारी अन् बाजरीच्या खरेदीत राज्याच्या उद्दिष्टात वाढ - छगन भुजबळ

महेंद्र महाजन
Tuesday, 12 January 2021

किमान आधारभूत किमतीने भरडधान्य योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ साठी केंद्र सरकारने मका, ज्वारी आणि बाजरीच्या खरेदीच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. राज्यात १५ लाख १८ हजार क्विंटल मका आणि अडीच लाख क्विंटल ज्वारी, ६० हजार क्विटंलपर्यंत बाजरी खरेदीसाठी राज्य सरकारला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला

नाशिक : किमान आधारभूत किमतीने भरडधान्य योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ साठी केंद्र सरकारने मका, ज्वारी आणि बाजरीच्या खरेदीच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. राज्यात १५ लाख १८ हजार क्विंटल मका आणि अडीच लाख क्विंटल ज्वारी, ६० हजार क्विटंलपर्यंत बाजरी खरेदीसाठी राज्य सरकारला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

उद्दिष्ट १४ डिसेंबर २०२० ला पूर्ण झाले होते

भुजबळ म्हणाले, की खरीप हंगामासाठी किमान आधारभूत किमतीच्या भरडधान्य योजनेंतर्गत चार लाख ४९ हजार क्विंटल मका, बाजरी नऊ हजार ५०० क्विंटल बाजरी आणि ज्वारी खरेदीसाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला मान्यता दिली होती. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनतर्फे राज्यात १२२ व आदिवासी विकास महामंडळातर्फे ५२ खरेदी केंद्रांद्वारे भरडधान्य खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र राज्यात झालेल्या पीकपद्धतीतील बदलांमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका आणि बाजरीचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठीचे देण्यात आलेले उद्दिष्ट १४ डिसेंबर २०२० ला पूर्ण झाल्याने १५ डिसेंबर २०२० पासून मका आणि बाजरीची खरेदी बंद झाली होती. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची मका, ज्वारी, बाजरीची खरेदी बाकी राहिल्याने  १५ लाख क्विंटल मका, अडीच लाख क्विंटल ज्वारी आणि एक लाख सात हजार क्विंटल बाजरी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाने केंद्र सरकारकडे केली होती. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा 

३१ जानेवारीपर्यंत खरेदी 

भुजबळ यांनी किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेंतर्गत मका आणि बाजरीचे उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीसाठी राज्याला उद्दिष्ट वाढवून दिल्यामुळे कोरडवाहू खरीप शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. भरड धान्य खरेदी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे.  

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: target for procurement of sorghum and millet along with maize has been increased nashik marathi news