esakal | "चलो मालेगाव ! मालेगाव आहे का? ‘ती’ हाक आता ऐकू येईना..कोरोनामुळे सारेच भकास
sakal

बोलून बातमी शोधा

taxi stand 12.jpgtaxi stand 12.jpg

‘चलो मालेगाव! चलो मालेगाव ! मालेगाव आहे का? मालेगाव?’ अशी हाक गेल्या सहा महिन्यांपासून  ऐकू येईनाशी झाली आहे. एरवी गजबजलेला हा टॅक्सी स्टँड  लॉकडाउनमुळे भकास झाला आहे. ​

"चलो मालेगाव ! मालेगाव आहे का? ‘ती’ हाक आता ऐकू येईना..कोरोनामुळे सारेच भकास

sakal_logo
By
अंबादास देवरे

नाशिक / सटाणा : ‘चलो मालेगाव! चलो मालेगाव ! मालेगाव आहे का? मालेगाव?’ अशी हाक गेल्या सहा महिन्यांपासून  ऐकू येईनाशी झाली आहे. एरवी गजबजलेला हा टॅक्सी स्टँड  लॉकडाउनमुळे भकास झाला आहे. 

‘ती’ हाक आता ऐकू येईना 
गेल्या पंचवीस वर्षांपासून सटाणा-मालेगाव, मालेगाव-सटाणा अशी टॅक्सीसेवा सुरू होती. सटाणा शहर व मालेगाव शहरातील शंभरावर टॅक्सीचालक-मालकांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून होते. कोरोनामुळे या सर्वच घटकांची वाताहात झाली असून, शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे सर्व टॅक्सीचालक-मालक उदरनिर्वाहासाठी मोलमजुरीवर जात आहेत. 


फेरीचा मुहूर्तही नाही
सटाणा-मालेगाव दररोज परतीच्या फेऱ्या मारून उपजीविका करणाऱ्या चालक-मालकांना जीवन नकोसे झाले आहे. या व्यावसायिकांच्या अंबेसिडर ही वाहने कालबाह्य झाल्याने त्यांची जागा मारुती ओमनी या प्रवासी व्हॅनने घेतली आहे. काही व्यावसायिकांनी सहा महिन्यांपूर्वी बँकेकडून कर्ज घेऊन नव्याने बाजारात आलेली इको व्हॅन खरेदी केल्या. मात्र या गाडीच्या सटाणा-मालेगाव फेरीचा मुहूर्तही झालेला नाही. 


मोलमजूरीतून उदरनिर्वाह
बऱ्याच व्यावसायिकांच्या या प्रवासी गाड्या बँकेकडून कर्जाने घेतलेल्या आहेत. त्यांचे कर्जाचे हप्तेही भरणे शक्य होत नसल्याने चालक व मालकांनी गवंडीच्या हाताखाली बिगारी म्हणून, कांदाचाळीवर गोण्या भरणे, डाळिंब द्राक्षाची पॅकिंग किंवा दारोदार जाऊन फळे, भाजीपाला विकणे असे तात्पुरते व्यवसाय करून कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालविला आहे. त्यातच वाहनांचे हप्ते, इन्शुरन्स, घरबांधणी कर्ज, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, वीजबिल, गाडीचे मेन्टेनन्स हे सर्व भागवायचे कसे, असे प्रश्न व्यावसायिकांना सतावत आहेत. 

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा


जगावे कि मरावे असा प्रश्‍न
आम्ही आता जगावे की मरावे, अशा संतप्त भावना चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष आबा सोनवणे, शेख मोहिद्दीन, मोहम्मद सय्यद, अशोक मोरे, दिलीप अहिरे, दोधा देवरे, महेश महाजन, राजू वाघ, अकबर पटेल, अखिल मन्सुरी, दीपक पवार, सोनू देसले, संजय सोनवणे, विजय निकम, मुन्ना देवरे, नाझिम मिर्झा, नितीन देवरे, कलीम पटेल, अश्फाक शेख, रियान शेख आदींनी व्यक्त केल्या आहेत. 

दिवसभरात एकही फेरी नाही
माझे वडील एकार शेख हे टॅक्सी स्टँडवर प्रवासी भरण्याचे काम गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून करत होते. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर तोच व्यवसाय पुढे चालवायचं ठरवलं. मात्र व्यवसाय बंद पडल्याने उपासमारीने हतबल झालो असल्याचे रियान शेख यांनी सांगितले. तर दिवसातून एक फेरी होण्याचे पडले आहे; जर मालेगाव परतीचे प्रवासी नाही मिळाले तर मुक्काम पडतो. ती रात्र वैऱ्याची म्हणून काढणे भाग पडतं, असे टॅक्सीचालक मोईद्दीन शेख यांनी सांगितले.

हेही वाचा >  थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना


संपादन : भीमराव चव्हाण