गोड चहा झाला कडू! चहाप्रेमींच्या खिशाला लागणार कात्री; कसे ते वाचा

प्रमोद सावंत
Friday, 28 August 2020

आगामी काळात यामुळे चहा पावडर निर्यातीवरही परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जगात भारत चहा उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर, तर निर्यातीत चौथ्या क्रमांकावर आहे. देशातील सर्व राज्यांत चहा लोकप्रिय आहे.

नाशिक : (मालेगाव) भारतामध्ये कितीही विविधता असली तरीही काही गोष्टींमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर साम्य आढळुन येतं. अशीच एक गोष्ट म्हणजे भारतीयांच्या आवडीची पेयं चहा...या पेयांवर तर भारतीयांचं विशेष प्रेम. मात्र चहाप्रेमींनो आता हा गोड चहा कडू लागणार ...

पश्‍चिम व दक्षिणेकडील राज्यात प्रामुख्याने चहा मळे

चहा उत्पादनात अग्रेसर असलेल्या आसामसह पश्‍चिमेकडील राज्यांना पुराचा फटका बसत असून, चहा मळेधारकांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे चहाच्या उत्पादनात घट झाली. परिणामी चहा पावडरच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. चहा मळ्यांमधून ठोक खरेदीदारांना दीडशे ते दोनशे रुपये किलो दराने मिळणारा चहा थेट ३०० ते ४०० रुपये किलोपर्यंत पाेचला आहे. कोरोनाच्या संसर्ग काळात चहा मळ्यांमधील पाने तोडली न गेल्याने त्याचाही परिणाम झाला. आगामी काळात यामुळे चहा पावडर निर्यातीवरही परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जगात भारत चहा उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर, तर निर्यातीत चौथ्या क्रमांकावर आहे. देशातील सर्व राज्यांत चहा लोकप्रिय आहे. पश्‍चिम व दक्षिणेकडील राज्यात प्रामुख्याने चहा मळे आहेत. यात आसाम, दार्जिलिंग, निलगिरी, दोआस, कांगडा, पश्‍चिम बंगाल, केरळ येथील चहा प्रसिद्ध आहे. देशात कोलकता, कोचिन, कन्नूर, अमृतसर, गुवाहाटी, सिलिगुडी, कोईम्बतुर या सहा ठिकाणी चहा लिलाव केंद्रे आहेत. 

देशातील उत्पादनापैकी ७० टक्के चहा देशात विक्री

टाटा, हिंदुस्तान लिव्हर, गिरणार, सोसायटी, सपट, वाघ बकरी आदी नामवंत चहा कंपन्या ७५ टक्के, तर उर्वरित २५ टक्के चहा ठोक व्यापारी ट्रेडर्स खरेदी करतात. उत्पादन घटल्याने व मोठ्या कंपन्यांच्या खरेदीने ठोक व्यापारी हवालदिल झाले आहेत. देशातील उत्पादनापैकी ७० टक्के चहा देशात विक्री होतो, तर ३० टक्के निर्यात होते. यंदा आसाममधील पुरामुळे चहा मळ्यांमध्ये पाणी शिरले. त्याचा फटका उत्पादनाला बसला. चहा मळ्यांमधील नाल्या पाण्याने पूर्णपणे भरल्या होत्या. मजुरांनी पाण्यात उभे राहून मळ्यांमधील पाने ताेडली. 

चहाचे प्रकार 

डस्ट (बारीक), पीडी (पीको डस्ट), ओएफ (ममरी डस्ट), बीटी, बीओपी (ममरी), बीओपीएसएम (जाडी दानेदार), बीपीएस, ऑर्थोडॉक्स हा सर्वांत महाग चहा आहे. चहा पाने कटिंग कमी प्रमाणात करून काडीच्या व जाड मोठ्या आकारात हा चहा येतो. 

चहा उत्पादनात भारत 

* १८३६ मध्ये प्रामुख्याने चहा लागवड सुरू 

* जगातील एकूण उत्पादनापैकी २२ टक्के उत्पादन भारतात. 

* देशात २४०० मिलियन किलोग्रॅम चहा उत्पादन 

* उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानावर 

* निर्यातीत चौथ्या स्थानावर 

* दर वर्षी सुमारे सहा ते सात हजार कोटी रुपयांची चहा निर्यात 

चहा निर्यातदार दहा प्रमुख देश क्रमनिहाय 

चीन, श्रीलंका, केनिया, भारत, जर्मनी, पोलंड, ब्रिटन, अमेरिका, जापान, इंडोनेशिया  

हेही वाचा > वाद सोडवणे बेतले दोघा भावांंच्या जीवावर! पोलीस कॉन्स्टेबल ठरणार घटनेचे महत्वपूर्ण साक्षीदार; काय घडले नेमके?

आंतरराष्ट्रीय बाजारात चहाचा दर वाढल्याने शहरातील चहा पावडरच्या प्रतिकिलो मागे प्रतिनिहाय ५० ते १०० रुपये किलो दरवाढ केली. याशिवाय ठोक व्यापाऱ्यांना बिलासाठी दिली जाणारी ४५ दिवसांची सवलतही बंद झाली. व्यापाऱ्यांना थेट ‘आरटीजीएस’ करावा लागतो. २५० रुपये किलोपासून ते एक हजार रुपये किलोपर्यंत चहा पावडरचे दर आहेत. उत्तर महाराष्ट्रात शहरात सर्वाधिक चहा व पावडर विक्री होते. गुवाहाटीहून थेट जळगावला प्रमुख केंद्रावर चहा येतो. येथून उत्तर महाराष्ट्रात वितरित होतो. - माजीद अन्सारी मुख्य वितरक सिटी टी सप्लाय कंपनी, मालेगाव 

हेही वाचा > घरभाड्याची मागणी करताच भाडेकरूने घरमालकासोबत केला "धक्कादायक" प्रकार! परिसरात खळबळ; काय घडले वाचा

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tea powder prices doubled nashik marathi news