आरक्षण बदलल्याने शिक्षक भरती पुन्हा लांबणीवर! मोठा कालावधी लागणार असल्याने भरती प्रक्रिया पुन्हा रखडण्याची भिती

विजय पगार
Wednesday, 13 January 2021

अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी राज्यभरातील शिक्षक भरती पुन्हा आरक्षण बदल झाल्याने लांबली आहे. 

इगतपुरी (जि.नाशिक) : अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी राज्यभरातील शिक्षक भरती पुन्हा आरक्षण बदल झाल्याने लांबली आहे. 

१४ ऐवजी २६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; आणखी मुदतवाढीची शक्यता 

शैक्षणिक संस्थांतील शिक्षक भरती पारदर्शी व्हावी, या हेतूने राज्य शासनाने पवित्र पोर्टलची निर्मिती केली होती. या पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीला सुरवातीपासूनच घरघर लागली. मध्यंतरीच्या काळात शासकीय कोट्यातील पाच हजार ८०० जागा भरल्या असल्या, तरी उर्वरित सहा हजार जागा अजून भरणे बाकी आहे. यामध्ये खासगी शैक्षणिक संस्थांचा मोठा वाटा आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या आरक्षणामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिकांच्या आधारे शासनाने २३ डिसेंबर २०२० मधील तरतुदीनुसार लॉगिन करून १४ जानेवारीपर्यंत प्रवर्ग बदल करून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. दरम्यान, २५ जानेवारीला मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. त्यात पुन्हा बदल झाला, तर आरक्षणाचा बदल पुन्हा उमेदवारांना करावा लागणार आहे. याला मोठा कालावधी लागणार असल्याने भरती प्रक्रिया पुन्हा रखडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

राज्यात सात लाख उमेदवारांचा प्रश्न कायम 
राज्यात २०१० नंतर शिक्षक भरती प्रक्रियेस प्रतिबंध करण्यात आला होता. माध्यमिक स्तरावरही इंग्रजी- विज्ञान विषय वगळता नियुक्ती न देण्याचे आदेश शासनाने यापूर्वी दिले होते. त्यामुळे २०१० नंतर राज्यात सुमारे सात लाखांहून अधिक उमेदवार डी.एड. बी.एड. पात्रताधारक ठरले आहेत. या उमेदवारांनी पात्रता धारण केली असली तरी त्यांना नियुक्ती मात्र मिळू शकलेली नाही. त्यामुळे अनेकांनी या कालावधीत स्पर्धा परीक्षेचे माध्यम निवडून विविध विभागांत सेवा करणे पसंत केले. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती व्हावी, यासाठी अनेक वर्षे आम्ही लढा देत आहोत. एसीबीसी या प्रवर्गात जे उमेदवार आहेत व ज्यांना ईडब्ल्यूएस या प्रवर्गाचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना १४ जानेवारीपर्यंत लॉगिन करून बदल करावयाची मुदत दिली आहे. बदलाची मुदत २६ जानेवारीअखेर करावी व त्यानंतर ही भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी. - ॲड. परमेश्वर इंगोले- पाटील, राज्याध्यक्ष, रयत संकल्प डी.एड.बी.एड. संघटना  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher recruitment postponed due to change in reservation nashik marathi news