ऑनलाईन शिक्षणाची साप्ताहिक माहिती भरण्यास शिक्षकांचा विरोध; आदेश रद्द न केल्यास बहिष्कार

विजय पगारे 
Monday, 5 October 2020

ऑनलाईन अध्ययन - अध्यापनाची साप्ताहिक माहिती लिंकवर भरण्या संदर्भात परिपत्रक काढले आहे. ही माहिती लिंकवर भरावयास लावणे म्हणजे शिक्षक व शिक्षण प्रक्रियेतील अधिकारी यांच्यावर अविश्वास दाखवल्याची भावना निर्माण झाली आहे. 

नाशिक/इगतपुरी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षणाची प्रक्रिया सुरु आहे राज्याच्या विविध भागात शिक्षक ऑनलाईन अध्यापना बरोबरच कोविडमुळे उद्भवलेल्या आपत्ती व्यवस्थानातील कोरोना साह्यता कक्ष, माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत विविध सर्वेक्षण, विलगीकरण कक्ष यात कार्यरत आहेत हे करत असताना ऑनलाईन अध्ययन - अध्यापनाची साप्ताहिक माहिती लिंकवर भरण्या संदर्भात परिपत्रक काढले आहे. ही माहिती लिंकवर भरावयास लावणे म्हणजे शिक्षक व शिक्षण प्रक्रियेतील अधिकारी यांच्यावर अविश्वास दाखवल्याची भावना निर्माण झाली आहे. 

यामुळे अध्ययन-अध्यापन माहिती भरण्याचे आदेश रद्द करावेत,अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. आदेश रद्द न केल्यास या प्रक्रियेवर बहिष्कार घालणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी दिली आहे.सद्यस्थितीत राज्यात ग्रामीण भागात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळा बंद शिक्षक सुरु या उपक्रमाअंतर्गत शिक्षक प्राप्त परिस्थितीत ऑनलाईन अध्यापन करत आहेत. विविध शैक्षणकि उपक्रम सुरु असताना शिक्षक शासनाच्या आदेशानुसार कोविड विरोधातील कामकाजात हि कार्यरत आहेत, या कामामुळे राज्यातील अनेक शिक्षकांना कोरोना संसर्गही झाला आहे. 
शिक्षकांना या कामकाजातून कार्यमुक्त करणे संदर्भात शालेय शिक्षण विभागाने आदेश काढून स्थानिक प्रशासनाला शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची सूचनाही दिलेली आहे.परंतु त्यानुसार शिक्षकांना कार्यमुक्त तर करण्यात आलेच नाही तरीही शिक्षक आपत्ती व अध्यापन दोन्ही हि जबाबदारी पार पाडत आहेत. 

हेही वाचा >  गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

त्यातच आता ऑनलाईन अहवालाचा आदेश काढल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून हा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष आर.के.खैरनार,कार्याध्यक्ष अर्जुन ताकाटे बाजीराव सोनवणे,धनराज वाणी,इगतपुरी तालुकाध्यक्ष निवृत्ती नाठे,तालुका नेते उमेश बैरागी,सचिन वडजे, संतोष मेमाणे,प्रदीप पेखळे,संजय भोर आदींनी केली आहे. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

कोणताही विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहू नये म्हणून शिक्षक आपापल्या परिने प्राप्त परिस्थितीत ऑनलाईन अध्यापन करत आहेत आणि आता त्याचा अहवाल देणे म्हणजे अविश्वास व्यक्त होतो यात बदल होणे आवश्यक आहे 
- अंबादास वाजे, राज्य कार्याध्यक्ष 
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ 

ग्रामीण व आदीवासी भागातही शिक्षकवर्ग आपला ऑनलाईन ,ऑफलाईन कार्य करुन ज्ञानार्जन करीत आहेत जो पर्यंत पारिस्थिती आवाक्यात येत नाही तोपर्यंत असेच कार्य सुरु राहील यासाठी मार्गदर्शन करावे अशी आशा आहे 
- धनराज वाणी, शिक्षकनेते, त्र्यंबकेश्वर  
 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers oppose filling out weekly information nashik marathi news