"राज्यात राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती नाही" - रामदास आठवले

महेंद्र महाजन
Sunday, 18 October 2020

मुख्यमंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली ‘सेक्युलर' झालेत. खरे म्हणजे, शंभर ते दोनशे जणांच्या भक्तांची यादी करुन एकेकांना दर्शन मिळावे अशा पद्धतीने धर्मस्थळे खुली व्हायला हवीत असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

नाशिक :  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारखी परिस्थिती नसल्याचा निर्वाळा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिला. तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबद्दल बोलताना त्यांनी शिवाजी पार्कमध्ये झेंडे लावावे, छोट्या आकाराचे व्यासपीठ उभारावे, शंभर जणांना बोलवावे आणि दूरचित्रवाहिन्यांवरुन त्याचे थेट प्रक्षेपण करावे, असा सल्ला त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिला. त्याचवेळी कायदा तोडू नका, अन्यथा कारवाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घ्यावा लागेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

कायदा-सुव्यवस्था हाताळण्यात अपयश आल्यास मग मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असा इशाराही द्यायला आठवले यांनी मागे-पुढे पाहिले नाही. नाशिकच्या दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना मंदिरे खुली करण्याच्या भाजपच्या मागणीच्या प्रश्‍नांवर बोलताना ते म्हणाले, की सर्व धर्मस्थळे खुली झाली पाहिजेत, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे मुख्यमंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली ‘सेक्युलर' झालेत. खरे म्हणजे, शंभर ते दोनशे जणांच्या भक्तांची यादी करुन एकेकांना दर्शन मिळावे अशा पद्धतीने धर्मस्थळे खुली व्हायला हवीत. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

अन्यथा चित्रीकरण बंद पाडू 

‘फिल्म इंडस्ट्री‘ मुंबईत राहायला हवी, अशी आग्रही भूमिका मांडत असताना  आठवले यांनी अंमली पदार्थांच्या वापराच्या अनुषंगाने चर्चेत आलेल्या अभिनेते-अभिनेत्रींना चित्रपटांमधून भूमिका दिल्या जाऊ नयेत, अन्यथा अशा कलावंतांना भूमिका दिल्यास अशा चित्रपटांचे चित्रीकरण रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते बंद पाडतील, असा इशारा दिला. पायल घोषने अनुराग कश्‍यप यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीची गंभीर दखल सरकारने घेतली नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर चौकशीला सुरवात झाली. मात्र अनुराग यांना अद्याप अटक झालेली नाही. एवढेच नव्हे, तर शिवसेनेने त्याविरुद्ध आवाज उठवला नाही. चित्रपट दुनियेत हा रोग लागला आहे. महिला कलावंतांनी त्यांच्यावर अत्याचार झाला असल्यास गप्प बसू नये. मला भेटावे अथवा पोलिसांमध्ये तक्रार करावी. 
 
कोरोना रुग्ण संख्येत घट सुरु 

जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱयांची बैठक झाली. त्यामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने काही माहिती मिळाली. त्यानुसार जिल्ह्यात ८८ हजार ८६१ रुग्ण आढळले. त्यापैकी ८० हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होणाऱयांचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोचले आहेत. मृत्यूचे राज्याचे प्रमाण २.७० टक्के असून जिल्ह्यात १.७७ टक्के जणांचा मृत्यू झाला आहे, असे सांगून श्री. आठवले यांनी कोरोनाचे औषध आल्यावर मृत्यूचे प्रमाण ०.१ टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. देशात वर्षाला अपघातामध्ये दीड लाख जणांचा मृत्यू होतो. कोरोना संसर्गामुळे सव्वा लाख जणांचा मृत्यू झाला आहे, अशीही माहिती देत असताना शारीरिक अंतर ठेवा, गर्दी करु नका, आपल्यामुळे दुसऱयाला त्रास होईल असे राहू नये असेही श्री. आठवले यांनी सांगितले. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

खडसेंना रिपब्लिकन पक्ष प्रवेशाचे निमंत्रण 

एकनाथ खडसे हे नाराज आहेत. ते माझ्या जवळचे मित्र आहेत. बहुजन समाजाचे नेते म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी नाराजीतून आमदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये. त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा. भविष्यकाळात राज्यपाल नियुक्तीसाठी मी प्रयत्न करेन, असेही आठवलेंनी स्पष्ट केले. 

आठवले म्हणालेत.... 

० केंद्राकडे राज्य सरकारने दहा हजार कोटींची मागणी केली असली, तरीही तेवढे पैसे मिळणार नाहीत. चार ते पाच हजार कोटी रुपयांची मदत मिळण्यासाठी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना मी पत्र लिहणार आहे 
० जम्मू-काश्‍मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांनी ३७० कलम हटवण्यासाठी चीनच्या मदतीची उल्लेख केला असल्याने त्यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवायला हवा 
० राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होईल. त्यांच्या सरकारचा सात-बारा उतारा कोरा होण्याची वेळ आली पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप शेतकऱयांचा सात-बारा उतारा कोरा केलेला नाही 
० अतिवृष्टीने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काहीही करावे, कर्ज काढावे पण शेतकऱयांना पूर्ण पिकांची किंमत सरकारने द्यायला हवी 
० मराठा, ब्राह्मण, लिंगायत, जैन अशा सगळ्यांना आठ लाखांपेक्षा आत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळायला हवे 
० शिष्यवृत्तीचे बँकेत ६० कोटी पडून आहेत. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना अधिकाऱयांना देणार आहे. आॅक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये अर्धा आणि एप्रिलमध्ये उरलेला शिष्यवृत्ती हप्ता देण्याचा माझा प्रयत्न असेल 
० शिवसेनेला मुख्यमंत्री हवे असताना भाजपला सत्तेसाठी तीस आमदारांची आवश्‍यकता होती. अजित पवार यांनी आपल्याकडे पंचवीस ते तीस आमदार असल्याचे सांगितल्याने देवेंद्र फडणवीस यांनी घाईगर्दीत अजित पवार यांच्यासमवेत शपथ घेतली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there was no situation where presidential rule could be implemented ramdas athawale nashik marathi news