लॉकडाऊनमध्ये महामार्गावर अपघाताच्या प्रमाणात कमालीची घट.. अन् मोठी दुर्घटना तर नाहीच!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

लॉकडाउन काळात महिनाभर थांबलेले काम आता प्रगतिपथावर आहे. ऑक्‍टोबरपर्यंत पुलाचे काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास दिवाळीत प्रवास अधिक सुखकर होईल.

नाशिक / पिंपळगाव बसवंत : लॉकडाउन 23 मार्चला जाहीर झाल्यानंतर 10 जूनपर्यंत मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड-पिंपळगाव बसवंत-नाशिकपर्यंत 23 अपघात झाले. त्यातील जखमींची संख्या 14, तर दोन मृत झाले. मात्र डिसेंबर 2019 ते 20 मार्च 2020 या कालावधीत या मार्गावर 49 अपघातांमध्ये सहा मृत्यू, तर 31 जखमी झाले होते. लॉकडाउनमुळे राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट होता. त्यामुळे अपघात, मृत्यू आणि जखमी होण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. 

हा महामार्ग काही ठिकाणी चौपदरी, तर कुठे सहापदरी झाला खरा; मात्र सदोष उभारणीमुळे अपघात सुरूच राहिले. अनेक ठिकाणी अपघाताचे ब्लॅक स्पॉट तयार झाले. नागरिकांच्या आंदोलनानंतर महामार्ग प्राधिकरणाला उशिराने जाग आल्याने सध्या उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. चांदवड-पिंपळगाव ते नाशिकपर्यंत अनेक ठिकाणे "अपघाती स्थळ' ठरत होती. गेल्या तीन महिन्यांत शिरवाडे फाट्याजवळ मारुती व्हॅन व ट्रॅक्‍टर यांच्यात झालेला अपघात वगळता कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

विस्तारीकरण होऊनही महामार्गाला शाप ठरत असलेले चिंचखेड चौफुली, कोकणगाव चौफुली, ओझरचा गडाख कॉर्नर, सायखेडा चौफुली, जत्रा हॉटेल, रासबिहारी कॉर्नर येथे उड्डाणपूल उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. लॉकडाउन काळात महिनाभर थांबलेले काम आता प्रगतिपथावर आहे. ऑक्‍टोबरपर्यंत पुलाचे काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास दिवाळीत प्रवास अधिक सुखकर होईल.

हेही वाचा > निर्दयीपणाचा कळस! तीन दिवसाचे बाळ टाकले शेतात...अन् मग..

 
भरधाव वेगातून अपघात होण्याचे प्रकार घडतात. यात काहींचा जीव जातो. एखादा अवयव किंवा फॅक्‍चर होणे, असे प्रमाण लक्षणीय होते. लॉकडाउनमुळे बहुतेकजण घरीच होते. वाहतूक व अपघात कमी झाले. अपघातात गंभीर जखमी व मृत्यूचे प्रमाण कमी झाले. -डॉ. योगेश धनवटे, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र, पिंपळगाव बसवंत  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there were less accidents on the highway during the lockdown nashik marathi news