VIDEO : स्वघरी परतताच "त्यांच्या' चेहऱ्यावर उमलल्या आनंद छटा! कोटाला अडकलेले विद्यार्थी परतले नाशिकला..

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

जेईई, नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे जात असतात. तेथील शिकवण्यांमध्ये एक ते दोन वर्षांसाठी शिक्षण घेत असतात. असेच राज्यातील अनेक विद्यार्थी यंदाही कोटा येथे अध्ययनासाठी दाखल झालेले होते. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांना स्वघरी परतता आले नव्हते. त्यामुळे गेल्या महिन्याभराहून अधिक कालावधीपासून हे विद्यार्थी कोटा येथील आपल्या वसतीगृहांवर थांबून होते.

(फोटो / व्हिडिओ - अरुण मलाणी / केशव मते)

नाशिक : वेळ सायंकाळी पाचची. ठिकाण द्वारका चौक. गेल्या अनेक दिवसांपासून र्निमनुष्य असलेल्या या चौकात दुचाकी, चारचाकी वाहने येऊन थांबत होत्या. चिंतातुर झालेले बरेच जण सोशल डिस्टंसिंगचे पालन करत उभे होते. साडे पाचच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरुन दोन बसगाड्या दाखल होताच सर्वांच्या चेहऱ्यावर हसु उमलले. कोटा (राजस्थान) येथे लॉकडाऊनमुळे अडकलेल्या 32 विद्यार्थ्यांना या बसगाड्यांतून नाशिकमध्ये आणण्यात आले. या विद्यार्थ्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली असून त्यांना चौदा दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले जाणार आहे. स्वघरी परतताच या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद छटा उमटली होती.

कोटा येथे अडकलेले 32 विद्यार्थी नाशिकला परतले

जेईई, नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे जात असतात. तेथील शिकवण्यांमध्ये एक ते दोन वर्षांसाठी शिक्षण घेत असतात. असेच राज्यातील अनेक विद्यार्थी यंदाही कोटा येथे अध्ययनासाठी दाखल झालेले होते. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांना स्वघरी परतता आले नव्हते. त्यामुळे गेल्या महिन्याभराहून अधिक कालावधीपासून हे विद्यार्थी कोटा येथील आपल्या वसतीगृहांवर थांबून होते. तर इकडे त्यांच्या पालकांचे संपूर्ण लक्ष या विद्यार्थ्यांकडे लागून होते.

चौदा दिवस राहाणार होम क्‍वारंटाईन

परीस्थितीत सुधारणा झाल्यानंतर गेल्या बुधवारी (ता.29) धुळे येथून या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बसगाड्या सोडल्या होत्या. प्रत्येक गाडीसोबत दोन चालक दिलेले होते. दरम्यान नाशिकच्या 32 विद्यार्थ्यांना घेऊन काल (ता.30) दुपारी तीनच्या सुमारास दोन बसगाड्या कोटा येथून नाशिकसाठी रवाना झाल्या होत्या. शुक्रवारी (ता.1) राज्यसीमेत दाखल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या जीवात जीव आला. या प्रवासादरम्यान त्यांचे पालक सातत्याने त्यांच्या संपर्कात होते.

द्वारका येथे त्यांच्या पालकांकडे सुपूर्द

नाशिक जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना चांदवड येथील उपजिल्हा रूग्णालयात थांबवतांना त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. व त्यांना रोगप्रतिकारक शक्‍ती वाढीसाठीचे औषधे देण्यात आली. तपासणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन्ही बसगाड्या नाशिकच्या दिशेने निघाल्या. पिंपळगाव बसवंतला एक तर ओझरला एका विद्यार्थ्यांना सोडल्यात आले. तर उर्वरित विद्यार्थ्यांना द्वारका येथे त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून पालकांची स्वाक्षरी घेण्यात आली. या बसगाड्यांत वाहतूक निरीक्षक नरेश पाटील यांच्यासमवेत चालक राजू पाटील, एच डी. पाटील, सतीश पाटील, शशिकांत पाटील व धुळे आगारातील कर्मचारी पुन्हा परतले.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "करपलेल्या जखमी पायांनी लांब अंतर कापतोय खरं..पण घरात घेतील ना?"

आम्हाला सुखरूप आणल्याबद्दल शासनाचे आभार
सीए अभ्यासक्रमासाठी गेलेली असतांना गेल्या महिन्याभराहून अधिक कालावधीपासून राजस्थानच्या जयपुर येथे अडकून पडले होते. अन्य राज्यातील विद्यार्थ्यांना नेण्याची व्यवस्था होत असतांना आमची चिंता वाढली होती. परंतु आज आम्हाला सुखरूप आणल्याबद्दल शासनाचे आभार मानते.-मुग्धा जाधव, विद्यार्थिनी.

कोटा येथे असतांना पालकांच्या संपर्कात होतो. सर्व वसतीगृह रिकामे असल्याने आम्ही बसून कंटाळलेलो होतो. नाशिकला परतल्याचा खुप आनंद होतो आहे.- ऋषिकेश घुले, विद्यार्थी

राजस्थानमध्ये अडकलेल्या पाल्याची काळजी लागून होती. आम्ही सातत्याने त्याच्या संपर्कात होतो. आज ते घरी परतल्याने खुप आनंद होतो आहे. यापुढील चौदा दिवस त्यांची काळजी घेत घरीत थांबवणार आहोत.- रविंद्र बनकर, पालक.

हेही वाचा > नियती झाली क्रूर! आई..'सगळं सुख तुझ्या पायाशी आणेल मी"...म्हणणारा मुलगा तिच्यासमोर प्राण सोडतो तेव्हा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thirty two students returned from Kota to Nashik due to lockdown nashik marathi news