'त्या' एका निर्णयाने शेतकरी, व्यावसायिकांची उडाली झोप; वाचा सविस्तर बातमी

shirdi-highway.jpg
shirdi-highway.jpg

नाशिक : (सिन्नर) सिन्नर ते शिर्डी चौपदरी महामार्ग व स्वतंत्र पालखी मार्गाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (न्हाई) सुरू आहे. सुमारे ६० किलोमीटर अंतराचा हा महामार्ग सिन्नर व कोपरगाव तालुक्यातून जाणार आहे. न्हाईच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सव्वातीन फूट उंचीची भिंत उभारली जाणार आहे. यामुळे महामार्गालगत शेती व व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची झोप उडाली आहे. 

शेतकरी, व्यावसायिकांची उडाली झोप 

सिन्नर ते शिर्डीदरम्यान महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी डाव्या व उजव्या बाजूने मिळून सुमारे १०८ किलोमीटर अंतराची ही भिंत राहणार असून, १२ ते १५ किलोमीटर अंतर वापरासाठी सोडण्यात येणार आहे. त्यात प्रमुख गावे, महामार्गाला मिळणारे जोडरस्ते, वाणिज्यिक वापराची ठिकाणे आदींचा समावेश आहे. महामार्गाच्या बांधकाम आराखड्यातच ही बाब अंतर्भूत असली, तरी त्याबाबत जाहीरपणे कुठेही वाच्यता केली नव्हती. मात्र, दोन दिवसांपूर्वी याबद्दल समजल्यावर महामार्गालगतचे व्यावसायिक, शेतकऱ्यांच्या डोक्याचा ताप वाढला आहे. शासनाने या प्रकल्पासाठी मोबदला देऊन जमिनी विकत घेतल्या. त्यात अनेक जण भूमिहीन, तर काही अल्पभूधारक झाले. जमिनीच्या मिळालेल्या पैशांतून अनेकांचे महामार्गालगत व्यवसाय करणाऱ्या लोकांची गैरसोय करणारी संरक्षक भिंत हटविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी व व्यावसायिकांनी केली आहे. 

पगार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 

पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मेलद्वारे पत्र पाठवून महामार्गालगत बांधण्यात येणारी संरक्षक भिंत काढून टाकण्याची मागणी केली आहे. प्रकल्प लोकांच्या सोयीसाठी आहे. दळणवळण वाढले, तर रोजगाराच्या संधी वाढतील. इथे मात्र रस्त्यावर यायलाच मज्जाव केला जातोय, असा आरोप पगार यांनी केला आहे. 

शिर्डी महामार्गाला दोन वेळा जमीन अधिग्रहीत झाली आहे. आता शिल्लक असणाऱ्या जमिनीत शेती करणे शक्य होणार नाही, म्हणून व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. जवळपास २०० मीटरचा फ्रंट आहे. भिंतीमुळे ये-जा करण्यासाठी १५-२० फूट जागा मिळणार असेल, तर व्यवसाय सुरू करून फायदा होणार नाही. खासदार गोडसे यांच्याकडे शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत. भिंतीमुळे आमच्याच शेतात जायची चोरी होणार असल्याने विरोध करावाच लागेल. - इलाहीबक्ष शेख, माजी ग्रामपंचायत सदस्य, वावी 

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून शिर्डी महामार्गाचा आराखडा मंजूर करताना ६० मीटर जागेत अतिक्रमण होऊ नये, जनावरांनी रस्ता ओलांडून अपघात होऊ नये, यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची सूचना केली. त्यानुसार हे काम होणार असले, तरी लोकांची विशेषतः शेतकऱ्यांची गरज ओळखून ठिकठिकाणी जागा सोडण्यात येणार आहे. गावात भिंतीची अडचण होणार नाही. मात्र, गावाबाहेर एकमेकांना सहकार्य झाले, तर कुणालाही या भिंतीचा अडसर होणार नाही. स्वतःच्या जागेत महामार्गालगत व्यवसाय असणाऱ्यांना नियमानुसार गरजेपुरता रस्ता सोडण्यात येईल. - श्रावण कुमार, प्रकल्प व्यवस्थापक, मोन्टेकार्लो कंपनी  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com