इगतपुरीत कोरोनामुळे तीन रेशन दुकानदारांचा मृत्यू; विमाकवच देण्याची रेशन दुकानदारांची मागणी

ज्ञानेश्वर गुळवे
Friday, 2 October 2020

या सर्वांचे उपचारादरम्यान लाखो रुपये खर्च झाले असून, उपचारासाठी नातेवाईक व इतर लोकांकडे मदत म्हणून हात पसरावे लागले आहेत. शासनाकाइून मिळणारे कमिशन तुटपुंजे असून, दुकानदारांचे उपजीविकेचे साधन दुकान हेच आहे.

नाशिक / इगतपुरी : कोरोनामुळे इगतपुरी तालुक्यात रामदास चव्हाण, पुंजा वाजे व प्रल्हाद जाधव अशा तीन रेशन दुकानदारांचा मृत्यू झाला. कोरोना काळात रेशन दुकानदारांना कुठलेही संरक्षण नाही. त्यामुळे उपचारासाठी शासनाने अर्थसहाय्य करावे तसेच त्यांना विमाकवच द्यावे, अशी मागणी रेशन दुकानदारांनी केली आहे. गुरुवारी (ता.१) इगतपुरी तालुक्यातील रेशन दुकानदारांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन दिले. 

कोरोनामुळे तीन रेशन दुकानदारांचा मृत्यू
आठवड्यात इगतपुरी तालुक्याचे ज्येष्ठ दुकानदार रामदास चव्हाण यांचे कोरोनामुळे निधन झाले. तसेच मंगळवारी पुंजाराम वाजे व इगतपुरी तालुका सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांचेही कोरोनाने निधन झाले. या सर्वांचे उपचारादरम्यान लाखो रुपये खर्च झाले असून, उपचारासाठी नातेवाईक व इतर लोकांकडे मदत म्हणून हात पसरावे लागले आहेत. शासनाकाइून मिळणारे कमिशन तुटपुंजे असून, दुकानदारांचे उपजीविकेचे साधन दुकान हेच आहे. परंतु त्यानंतरही प्रपंच चालत नाही आणि आताही कोरोनाच्या महामारीमुळे तालुक्यात अनेक दुकानदार कोरोनावर उपचार घेत आहेत. 

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

विमाकवच देण्याची रेशन दुकानदारांची मागणी 
तालुक्यातील सर्व दुकानदार आजपर्यंत शासनाचे सर्व नियम सांभाळून दुकाने चालवत आहेत. यापूर्वी जिल्हा संघटनेतर्फे दुकानदारांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाकडे अनेकदा निवेदन देऊन मागण्या केल्या आहेत. दुकानदार आजारी पडल्यास ऑफलाइन पद्धतीने धान्यवाटपाची मंजुरी द्यावी, अशा मागण्या निवेदनात केल्या असून, वरील मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास इगतपुरी तालुक्यातील दुकानदार ऑक्टोबरचे धान्य उचलून वाटप करणार नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे. 

>>> नाशिकच्या महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शशी उबाळे, अरुण भागडे, तात्या पाटील भागडे, संजय गोवर्धने, गौतम पंडित, बबलू गटकळ, गुलाब वाजे, शिवाजी पोरजे, गोविंद धादवड, बाळासाहेब घोरपडे, राजेंद्रसिंह परदेशी आदी रेशन दुकानदार उपस्थित होते. 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three ration shopkeepers die due to corona in Igatpuri nashik marathi news