कोरोनामुळे तीन हजारावर रिक्षा चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; कुटुंबियांचीही आर्थिक परवड

राजेंद्र दिघे
Thursday, 27 August 2020

लॉकडाऊनमुळे रिक्षा बंदच तर धंदा गेलाच गेला तर घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. दरम्यान दर तीन वर्षांनी परवाना नुतनीकरणाचा नियम असल्याने अनेकांना दर दिवशी शंभर रूपये दंडाचा आर्थिक फटका बसणार असल्याचे रिक्षा चालकांनी सांगितले.

नाशिक/मालेगाव : कोरोना अनेकांच्या मुळावर उठला आहे. गेल्या पाच महिन्यात अनेकांचे रोजगार बुडाले. बेरोजगारी आधीच मोठ्या प्रमाणात असताना शहर व ग्रामीण भागातील तरूणांनी कर्ज काढून रिक्षा सुरू केली. लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. शहर व परिसरातील 1450 रिक्षा तर ग्रामीण भागातील 1200 ॲपेरिक्षा चालकांच्या कुटुंबाची आर्थिक परवड वाढली आहे.

बेरोजगार तरूण घरच्यांच्या मदतीने, स्थानिक पतसंस्था, बॅंकेकडून, खाजगी फायनान्स कंपनीकडून लोण करुन रिक्षा घेत आपला उदरनिर्वाह करतात. आधीच या व्यवसायात रिक्षांची खूप संख्या त्यात कोरोनाची भरीस भर पडल्याने या कुटुंबियांची आर्थिक परवड सुरू झाली. कौटुंबिक जबाबदाऱ्या, दवाखाना व विविध खर्चाने तंग झाले आहेत. 

हेही वाचा > घरभाड्याची मागणी करताच भाडेकरूने घरमालकासोबत केला "धक्कादायक" प्रकार! परिसरात खळबळ; काय घडले वाचा

रिक्षा व्यावसायिकांना मदतीची गरज

लॉकडाऊनमुळे रिक्षा बंदच तर धंदा गेलाच गेला तर घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. दरम्यान दर तीन वर्षांनी परवाना नुतनीकरणाचा नियम असल्याने अनेकांना दर दिवशी शंभर रूपये दंडाचा आर्थिक फटका बसणार असल्याचे रिक्षा चालकांनी सांगितले. सर्वत्र अडीअडचणी असताना उधार उसनवार कोण देणार अशा परिस्थितीत शासनाने रिक्षा व्यावसायिकांना मदत करण्याची गरज आहे. सध्याच्या लॉकडाऊन काळात फक्त दोनच प्रवाशांची परवानगी आहे.  कोरोनाच्या भीतीचा परिणाम या व्यवसायावर झाला असून दिवसाकाठी शंभर रुपये मिळणे दुरापास्त झाले असल्याचे मत रिक्षा चालक व्यक्त करतात. यातच अद्यापही ॲपे रिक्षांना प्रवासी वाहतूक परवानगी नसल्याने या कुटुंबावर इतर कामासह शेती, मजूरीच्या कामावर जावे लागत आहे. 

हेही वाचा > वाद सोडवणे बेतले दोघा भावांंच्या जीवावर! पोलीस कॉन्स्टेबल ठरणार घटनेचे महत्वपूर्ण साक्षीदार; काय घडले नेमके?

आकडे बोलतात-

रिक्षा व्यवसायावरील कुटुंब- 2650
शहर व तालुक्यातील रिक्षा-1450
ॲपे रिक्षा- 1200

कोरोनाचा असाही फटका-

मुळात कोरोना संसर्गाच्या भीतीने रिक्षाने प्रवास टाळतात. सर्वसामान्य व साधने नसलेली मंडळीच रिक्षाने प्रवास करतात. यातील संशयात्मकरित्या एखाद्या प्रवाशांकडून रिक्षा चालकांना संसर्गाचा धोका असतो. कुटुंबाची परवड टाळण्यासाठी ही जोखीम पत्करून कसाबसा रोजगार मिळवण्यासाठी धडपड आहे. 

रिक्षाच्या धंद्यात अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत. कोरोनाने मोठे नुकसान झाले. रोजगार बुडाला,आजही धंदा नाही.फायनान्स कंपनीकडून डिसेंबर अखेर कर्ज हप्ते फेडीस मुदतवाढ शासनाने दिली.मोटार वाहन परवाना नुतनीकरणास मुदतवाढ देण्यासह दंड टाळावा यासाठी कृषी मंत्री दादा भुसे यांना साकडे घालणार आहे. 
- सुनील चांगरे  (शहराध्यक्ष, मातोश्री रिक्षा चालक मालक संघटना)

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three thousand auto divers are in crisis due to corona nashik marathi news