Diwali Festival 2020 : अनोखे लक्ष्मीपूजन! ग्रामपंचायतीचा कारभार थेट गावापुढे; ताळेबंद ग्रामस्थांपुढे ठेवणारी एकमेव ग्रामपंचायत

vikharani.jpg
vikharani.jpg

येवला (जि.नाशिक) : विखरणी येथे सर्वधर्मीय सार्वजनिक लक्ष्मीपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे यानिमित्ताने गावविकासासाठी झालेल्या खर्चाचा ताळेबंद ग्रामस्थांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. ग्रामपंचायतीचा पारदर्शी कारभार गावापुढे ठेवल्याने त्याचे स्वागत होत आहे. सामुदायिक लक्ष्मीपूजन करून ताळेबंद ग्रामस्थांपुढे ठेवणारी ही एकमेव ग्रामपंचायत आहे. सामुदायिक लक्ष्मीपूजन करून विखरणी ग्रामस्थांनी सामाजिक एकोपा जपला आहे. 

सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत सामुदायिक लक्ष्मीपूजन 
विखरणी ग्रामपंचायतीत २००९ मध्ये तत्कालीन सरपंच मोहन शेलार यांच्या कल्पनेतून स्वायत्त संस्थेच्या ग्रामपंचायत कार्यालयात लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा सुरू केली असून, आजतागायत हा कार्यक्रम साजरा होतो. लक्ष्मीमातेच्या प्रतिमेसमोर किर्द, पासबुक, चेकबुक, पावती पुस्तके, खतावणी आदींचे मनोभावे पूजन करून ग्रामविकासाच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या ग्रामस्थांकडून लक्ष्मीपूजनाची सुरवात केली. सरपंच रामदास खुरसने यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन झाले. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात गावातील सर्वधर्मीय समाजबांधव एकत्र येऊन कार्यक्रमात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करतात. 

गावाच्या अडचणी करवसुलीच्या माध्यमातून सोडवितात
कराची रक्कम वेळेवर भरून ग्रामविकासाठी कार्यरत असलेले सरपंच, सदस्य यांना शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी चर्चात्मक सूचनाही ग्रामस्थांकडून यानिमित्ताने देण्यात आल्या. विविध योजनांच्या माध्यमातून गावविकासाचा आलेख उंचावत असून, गावात येणाऱ्या अडचणी करवसुलीच्या माध्यमातून सोडविल्या जातात. गावाच्या अधिकाधिक विकासासाठी सर्व नागरिकांनी कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच रामदास खुरसणे व सदस्यांनी केले. पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मोहन शेलार, दौलत शेलार, यमाजी शेलार, नामदेव पगार, राजेंद्र शेलार, शांताराम खरे, रवींद्र शेलार, रोहित शेलार, बाळू शेलार, काळू खुरसने, गफ्फार दरवेशी, किशोर ननवरे, दयानंद खरे, अरुण खरे, केशव पगार, दत्तू शेलार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

आमच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून, ग्रामस्थांनी दाद दिली आहे. कोरोनामुळे साध्या पद्धतीने गर्दी न करता ग्रामपंचायतीत सार्वजनिक लक्ष्मीपूजन केले. ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायतीविषयी आत्मीयता असावी, ग्रामपंचायत प्रशासनाविषयी विश्वास असावा, या हेतूने ग्रामपंचायतीच्या खर्चाचा लेखाजोखा ग्रामस्थांसमोर मांडला जातो. - मोहन शेलार, सदस्य, पंचायत समिती, येवला 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com