द्राक्ष काढणीला व्यापारी फिरकेना!...कोरोनामुळे ग्रेप्स इंडस्ट्रीदेखील हादरली, द्राक्ष वाहतूक बंद

एस. डी. आहिरे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या झळांमध्ये सर्वाधिक ग्रेप्स इंडस्ट्री होरपळत आहे. निफाड, दिंडोरी तालुक्‍यातील अद्याप 30 टक्के द्राक्ष काढणी शिल्लक आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नाशिक जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्या सुमारे दोन हजार टन द्राक्षांची वाहतूक ठप्प झाली आहे. द्राक्षशेतीवर अवलंबून असलेले अर्थकारण पूर्णपणे कोलमडणार आहे.

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या झळांमध्ये सर्वाधिक ग्रेप्स इंडस्ट्री होरपळत आहे. निफाड, दिंडोरी तालुक्‍यातील अद्याप 30 टक्के द्राक्ष काढणी शिल्लक आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नाशिक जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्या सुमारे दोन हजार टन द्राक्षांची वाहतूक ठप्प झाली आहे. द्राक्षशेतीवर अवलंबून असलेले अर्थकारण पूर्णपणे कोलमडणार आहे. 

बाजारपेठांवर द्राक्षांची भिस्त

अवकाळी पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव आदी संकटांशी झुंज देत व ऐनभरात आलेल्या द्राक्ष हंगामाला कोरोनाची दृष्ट लागली आहे. पिंपळगाव बसवंत, उगाव, मोहाडी आदी परिसरातून रोज 100 ट्रकमधून दोन हजार टन द्राक्षे परराज्यात पोहचत होती. गेल्या चार दिवसांपासून कोरोनाने हाहाकार उडवून दिल्याने त्याचा थेट परिणाम द्राक्ष हंगामावर झाला आहे. द्राक्ष वाहतूक न झाल्याने तब्बल तीन कोटींची द्राक्षे परराज्यात पोहचू शकली नाहीत. उत्तर प्रदेश, बांगलादेश, कानपूर, लखनौ, राज्यस्थान, कोटा, गोरखपूर, दिल्ली आदी ठिकाणच्या बाजारपेठांवर द्राक्षांची भिस्त आहे. तेथील बाजारपेठांमध्ये 144 कलमाची अंमलबजावणी, परराज्याच्या सीमारेषा बंद, अशी माहिती येऊ लागल्याने निफाड, दिंडोरी तालुक्‍यातील व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरविली आहे. 

रोज 70 लाख रुपयांची होणारी उलाढाल थांबली

दोन हजार टन द्राक्षांची काढणी थांबली आहे. त्यामुळे रोज 70 लाख रुपयांची होणारी उलाढाल थांबली आहे. याचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. 
यांसह द्राक्ष हंगामावर आधारित ट्रान्स्पोर्ट, पॅकिंग मटेरिअल, मजुरांनाही दणका बसला आहे. वाहतूक बंद असलेल्या पिंपळगाव बसवंत येथील बहुतांश ट्रान्स्पोर्टसमोर ट्रक उभे आहेत. द्राक्ष हंगामावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. औषध विक्रेत्यांना उधारी वसुली, बॅंकांच्या कर्जवसुलीवर मोठा परिणाम होणार आहे. 

हेही वाचा > ''त्याने' शाप दिला म्हणूनच कोरोनाची साथ पसरलीय!'...अन् महिलांनी चक्क लावलेले दिवे

भाजीपाल्याबरोबर फळांच्या विक्रीलाही शासनाने सद्यस्थितीत परवानगी द्यायला हवी, अन्यथा अगोदरच संकटात असलेला द्राक्ष उत्पादक उद्‌ध्वस्त होईल. औषध विक्रेत्यांची उधारी, बॅंकांचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत शेतकरी आहेत. काढणीला आलेल्या द्राक्षांच्या सौद्यासाठी व्यापारी येत नाहीत. - सुजित मोरे, द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव बसवंत 

हेही वाचा > ''कोरोना कळतो हो साहेब, पण या शेतमालाचं काय?''...शेतकऱ्यांची परिस्थितीशी झुंज सुरुच

द्राक्ष उत्पादकांनी अडचणीत येईल, तेथे राज्य शासनाच्या माध्यमातून द्राक्ष वाहतुकीसाठी प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. - दिलीप बनकर, आमदार, निफाड  

हेही वाचा> संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार - छगन भुजबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transport of two thousand tonnes of grapes jam nashik marathi news