गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय नामांतर मुद्दा पेटणार! आदिवासी संघटना आक्रमक; आंदोलनाचा इशारा 

कुणाल संत
Friday, 22 January 2021

गोरेवाडा (गोंडवाना) आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयास बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा (गोंडवाना) आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे नाव देण्यासाठी शासनाने निर्णय काढला. या निर्णयानंतर राज्यातील आदिवासी संघटनांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

नाशिक (जि. नाशिक) : नागपूर येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय नामांतराचा मुद्दा पेटणार आहे. त्यामुळे नामांतर करण्याचा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी राज्यातील आदिवासी संघटनांनी केली असून, या संदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे मुख्यमंत्री, महसूलमंत्री, आदिवासी विकासमंत्री, वनमंत्र्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

आदिवासी समाजात संतापाची लाट

१९ जानेवारीला नागपूर येथील गोरेवाडा (गोंडवाना) आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयास बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा (गोंडवाना) आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे नाव देण्यासाठी शासनाने निर्णय काढला. या निर्णयानंतर राज्यातील आदिवासी संघटनांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. कारण गोरेवाडा (गोंडवाना) येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो. त्यामुळे तेथील आदिवासी बांधवांची पहिल्यापासून मागणी आहे की गोंडवाना प्राणी संग्रहालय हे नाव मिळावे यासाठी आदिवासी बांधवांचा खूप वर्षांपासून हा लढा सुरू आहे. यातच १९ जानेवारीच्या निर्णयामुळे आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द केला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

 बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही पण..

या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत आमचा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नसून, ते आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत; परंतु नामांतरामधून आदिवासींवर एक प्रकारे अन्यायच आहे. शासन निर्णय तत्काळ रद्द करून आदिवासींवर होणारा हा अन्याय थांबवावा. मागणीचा विचार झाला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या वेळी संघटनेने दिला. या वेळी संघटना राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव, सरचिटणीस अनिल सुरत्ने उपस्थित होते.  

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tribal organization demand that the decision to rename the Gorewada International Zoo be reversed nashik news