रथोत्सवाची परवानगी नाकारल्याने त्र्यंबकेश्‍वरला रथाच्या दर्शनावरच समाधान 

कमलाकर अकोलकर
Monday, 30 November 2020

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या रथोत्सवाला ऐनवेळी परवानगी नाकारल्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला. मात्र अशाही स्थितीत भोलेनाथाच्या उत्सवास खंड पडू नये म्हणून नागरिकांनी नुसत्या रथाच्या दर्शनावर समाधान मानले. 

त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) : त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या रथोत्सवाला ऐनवेळी परवानगी नाकारल्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला. मात्र अशाही स्थितीत भोलेनाथाच्या उत्सवास खंड पडू नये म्हणून नागरिकांनी नुसत्या रथाच्या दर्शनावर समाधान मानले. 

तत्पूर्वी शनिवारी रात्री वैकुंठ चतुर्दशीनिमित्ताने विशेष पूजा व सप्त धान्यांची आरास करण्यात आली. रात्री हरिहर भेट करून पालखी काढण्यात आली. रथाची पूजा करून ब्रह्मदेवाची मूर्ती रथात ठेवून पूजा करण्यात आली. दुपारी चारला मंदिरातून सवाद्य पालखी मिरवणूक निघाली. एका पालखीत रजत व दुसरीत पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवून प्रवेशद्वारात राजवट नेऊन पंचमुखी मुखवटा रथात ठेवून पूजा व आरती झाली. सुवर्ण मुखवटा पालखीत ठेवून कुशावर्तावर पूजेसाठी नेण्यात आला. पालखीसमवेत विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम, ॲड. पंकज भुतडा, दिलीप तुंगार, तृप्ती धारणे व देवस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत

मंदिरात दीपमाळ 

सवाद्य पालखी मेन रोडवरून कुशावर्तावर नेण्यात आली. तेथे अभिषेक, पूजा झाल्यावर पुन्हा त्र्यंबकेश्वर मंदिरात नेण्यात आली. पालखी मार्गात सुंदर व मोठ्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. रात्री मंदिरात दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली. फुलांचे रस्त्यात गालिचे बनविले जातात. यंदा मात्र फाटा देण्यात आला. देवस्थानतर्फे यंदा फटाक्यांची आतिषबाजी नव्हती. पंचक्रोशीत हा उत्सव आज मात्र प्रातिनिधिक स्वरूपात साजरा झाला. महिलांनी त्रिपूरवाती आपापल्या घरी जाळल्या. कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर बाहेरील भाविकांनी सकाळी मंदिरात दर्शनास चांगलीच गर्दी केली होती. 

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trimbakeshwar Devasthan Rathotsav nashik marathi news