कोरोनाची नियमावली पाळत त्र्यंबकेश्वराच्या पालखीचे सीमोल्लंघन 

कमलाकर अकोलकर
Sunday, 25 October 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर वर्षीसारखा पालखी सोहळा नव्हता. ग्रामस्थांनाही यात सहभागास मनाई करण्यात आली. सकाळी देवस्थानच्या कोठी हॉलमध्ये शस्रांची पूजा करण्यात आली. 
 

नाशिक : दर वर्षीप्रमाणे विजयादशमी म्हणजे दसऱ्यानिमित्त त्र्यंबकेश्वराची पालखी सीमोल्लंघन करण्यास शहराबाहेर जात असते. त्याच, परंपरेनुसार रविवारी (ता. २५) दुपारी श्री त्र्यंबकेश्वराची पंचमुखी सुवर्ण मुखवटा असलेली पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरातून सीमोल्लंघनास निघाली. पालखीसमवेत विश्वस्त प्रशांत गायधनी, ॲड. पंकज भूतडा व संतोष कदम यांच्यासह मोजकेच मानकरी व कर्मचारी शारीरिक अंतर ठेवून होते. 

पालखी मेन रोडमार्गे कुशावर्त व तेथून सत्यनारायण मंदिराकडून शहराबाहेरील डावलटेकडीच्या पायथ्याशी नेण्यात आली. तेथे पारंपरिक पद्धतीने शमी वृक्षाचे पूजन विश्वस्तांच्या हस्ते झाले. ग्रामजोशी पराग मुळे यांनी पूजा सांगितली. त्यानंतर शमी वृक्षाची पाने लुटण्यात आली. यासाठी उपस्थितांची चढाओढ लागली होती. पालखीचे औक्षण सुवासिनींनी केले. पालखीचे पूजनही विश्वस्तांनी केल्यावर पालखी जव्हार चौफुलीकडून महादेवी मंदिर तेथून शनी, मारुती मंदिराकडून मंदिरात परतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर वर्षीसारखा पालखी सोहळा नव्हता. ग्रामस्थांनाही यात सहभागास मनाई करण्यात आली. सकाळी देवस्थानच्या कोठी हॉलमध्ये शस्रांची पूजा करण्यात आली. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trimbakeshwar palaklhi in navratri festival nashik marathi news