त्र्यंबकेश्‍वर दर्शनबारीला मुहूर्त कधी? लॉकडाउननंतर मंदिराच्या कामांना ब्रेक 

कमलाकर अकोलकर
Tuesday, 13 October 2020

त्र्यंबकेश्‍वरच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी काहीही सुविधा झाल्या नाहीत. सात महिन्यांपासून देशभर कोरोनामुळे लॉकडाउन आहे. लॉकडाउनच्या काळात मंदिर परिसर बंद असल्याने या काळात देवस्थान व मंदिर प्रशासनाने भाविकांसाठीच्या सोयी-सुविधांची कामे उरकून घेणे आवश्‍यक होते.

नाशिक / त्र्यंबकेश्‍वर : त्र्यंबकेश्‍वर मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या आवारात दर्शनबारी व पक्क्या मंडपाच्या उभारणीचा निर्णय झाला. मात्र लॉकडाउनच्या सात महिन्यांच्या शांततेच्या काळातही ही कामे ठप्पच आहेत. त्यामुळे एरवी भाविकांच्या गर्दीमुळे होत नसलेली कामे आता लॉकडाउनमुळे ठप्प आहेत. 

त्र्यंबकेश्‍वर दर्शनबारीला मुहूर्त कधी?
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर वर्षी पूर्व दरवाजात भाविकांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रणासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या मंडपाची उभारणी केली जाते. त्यासाठी दर वर्षी काही ला़खांची रक्कम खर्ची पडते. मात्र भाविकांच्या असुविधा कायम असतात. भाविकांची गर्दी वाढली म्हणजे, पर्यायी व्यवस्था म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचे शेड व दर्शनरांगा, भाविकांसाठी प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागते. दर वर्षी तात्पुरत्या स्वरूपाच्या सुविधांवर खर्च करण्याऐवजी कायमस्वरूपी व्यवस्थेसाठी आराखडा तयार करण्यात आला. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील नियमांशी बांधिल राहून म्हणजेच मंदिराच्या कोटाच्या भिंतीच्या वर कोणतेही पक्के वा तात्पुरते बांधकाम न करता किंवा मंदिर परिसरात अंतर्गत काहीही बदल न करता अटी व शर्तीचे पालन करीत भाविकांना सुविधा देण्याचे नियोजन होते. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

कामांना गती देण्याचा प्रयत्न नाही. 
मात्र, सध्याच्या विद्यमान विश्वस्तांना दोन वर्षांपेक्षा जास्त काळ पद स्वीकारून झाला आहे. पूर्वीच्या विश्वस्तांनी हा आराखडा मंजूर असल्याने ही कामे लवकर सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, वर्षापासून चर्चा आणि केवळ चर्चाच सुरू राहिली. त्याशिवाय त्र्यंबकेश्‍वरच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी काहीही सुविधा झाल्या नाहीत. सात महिन्यांपासून देशभर कोरोनामुळे 
लॉकडाउन आहे. लॉकडाउनच्या काळात मंदिर परिसर बंद असल्याने या काळात देवस्थान व मंदिर प्रशासनाने भाविकांसाठीच्या सोयी-सुविधांची कामे उरकून घेणे आवश्‍यक होते. मात्र कुठल्याही सोयी-सुविधा येथे झालेल्या नाहीत. तात्पुरत्या पत्र्याच्या मंडपाची उभारणी, दर्शनरांगा, शौचालये व पिण्याच्या पाण्याची सोय, वृद्ध व बालके, अपंग भाविकांसाठी व्यवस्था, स्क्रिनवर आतील दर्शन आदीच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न दिसत नाही. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

लॉकडाउन संधी माना 
लॉकडाउन ही संधी मानून मंदिराच्या कामासाठी परवानग्या मिळविणे, तात्पुरती कामे पूर्ण करून घेणे यांसारखी कामे करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी लॉकडाउनचा काळ हा संधी मानून प्रयत्न होण्याची गरज आहे.  

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trimbakeshwar temple will be open nashik marathi news