आठ महिन्यांपासून ठप्प असलेल्या 'त्र्यंबकेश्‍वर'च्या अर्थकारणाला येणार गती

कमलाकर अकोलकर
Tuesday, 17 November 2020

विश्‍वस्त मंडळाच्या नियमानुसार आता बाहेरील भाविकांना पूर्व दरवाजातून प्रवेश देण्यात येणार असून, स्थानिकांना ओळखपत्र दाखवून उत्तर दरवाजातून प्रवेश राहील. दक्षिण दरवाजा गायत्री गेटमधून बाहेर पडण्याचा मार्ग राहील. मंदिरात श्रीफळ, फुले, फळे व प्रसाद नेता येणार नाही. एकावेळी ८० भाविकांना प्रवेश असेल.

त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) : आठ महिन्यांपासून ठप्प असलेल्या त्र्यंबकेश्‍वरच्या अर्थकारणाला गती येणार आहे. सोमवार (ता. १६) दीवाळी पाडव्यापासून मंदिर उघडणार असल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळाची रविवारी दुपारी तातडीची बैठक अध्यक्ष न्यायधीश ए. एस. बोधनकर यांच्या उपस्थितीत होऊन त्यात कोरोना महामारीच्या काळात मंदिर प्रवेशासाठी नियम निश्‍चित करण्यात आले. 

त्र्यंबकराजाच्या मंदिरात फळ, फूल नेण्याला बंदी 
विश्‍वस्त मंडळाच्या नियमानुसार आता बाहेरील भाविकांना पूर्व दरवाजातून प्रवेश देण्यात येणार असून, स्थानिकांना ओळखपत्र दाखवून उत्तर दरवाजातून प्रवेश राहील. दक्षिण दरवाजा गायत्री गेटमधून बाहेर पडण्याचा मार्ग राहील. मंदिरात श्रीफळ, फुले, फळे व प्रसाद नेता येणार नाही. एकावेळी ८० भाविकांना प्रवेश असेल. भाविक सभामंडपात रेंगाळत बसणार नाहीत. तेथे कोणतीही पूजा करणार नाही. प्रसाद, तीर्थ, अंगारा येथे मिळणार नाही. ६५ वर्षांवरील वृद्ध व लहान मुले यांनी दर्शनाचा मोह टाळावा, मंदिर प्रांगणातील मूर्ती व वस्तूंना स्पर्श करणे व प्रदक्षिणा करण्यास मज्जाव असल्याचे विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

मंदिर उघडण्याने गावाच्या अर्थकारणाला मिळणार उभारी 
दिवाळी पाडव्याची परंपरेची पहाटेची विशेष पूजा चेअरमन व सहकारी करतील, असेही सांगण्यात आले . सोमवारी सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत भाविकांना मंदिर दर्शनास खुले असले तरीही दिवसभरात एक हजार भाविकांनाच दर्शनाचा लाभ घेता येईल. त्या दृष्टीने देवस्थानतर्फे व्यवस्था करण्यात येत असून, सॅनिटाइज व सोशल डिस्टन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याच धर्तीवर निवृत्तिनाथ समाधी मंदिरात भाविकांची दर्शनव्यवस्था करण्यात येईल, असे पूजा व विश्वस्त गोसावी यांनी सांगितले.  

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trimbkeshwar economy have started nashik marathi news