नाशिकमध्ये पतंगांची कोटीची उलाढाल आली लाखात! कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नैसर्गिक आपत्तीचा परिणाम

युनूस शेख
Thursday, 14 January 2021

शहरातील पतंगप्रेमींची सख्या बघता दर वर्षी पतंग आणि मांजा विक्रीतून शहरभरात सुमारे एक कोटीच्या घरात उलाढाल होत असते. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ती उलाढाल लाखांच्या घरात आली आहे.

नाशिक : शहरातील पतंगप्रेमींची सख्या बघता दर वर्षी पतंग आणि मांजा विक्रीतून शहरभरात सुमारे एक कोटीच्या घरात उलाढाल होत असते. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ती उलाढाल लाखांच्या घरात आली आहे. ५० टक्क्यांवर बाजार आल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. 

पतंगांची कोटींची उलाढाल आली लाखात 

गुरुवारी (ता. १४) मकरसंक्रांत आहे. तरीही पतंग आणि मांजा खरेदीसाठी हवी तशी गर्दी होत नाही. दर वर्षी १५ दिवस अगोदरपासून पतंग, मांजा खरेदी विक्रीसाठी दुकानात ग्राहकांची लगबग दिसत असते. विक्रेत्यांना जेवणासाठीही वेळ मिळत नसे. यंदा मात्र परिस्थिती वेगळीच आहे. सरासरी विचार केला, तर केवळ ४० ते ५० टक्के बाजार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. लॉकडाउनमुळे पतंगाचे उत्पादन कमी झाल्याने दरातही वाढ झाली आहे. शेवटच्या पाच ते सहा दिवसांच्या खरेदीवर विक्रेते अवलंबून असतात. यंदा मात्र शेवटचे तीन दिवस सलग अवकाळी पाऊस झाल्याने पतंगप्रेमींच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. याशिवाय पोलिस विभागाची विविध पथके तसेच महापालिकेचे पथक सतत तपासणीसाठी दुकानांवर येत आहे. ते पाहून पतंग खरेदीसाठी आलेले ग्राहक माल खरेदी न करता निघून जातात.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

गर्दी करण्यास मज्जाव असल्याचाही परिणाम

दुसरीकडे मुलांकडे नायलॉन मांजा आढळून आला, तर त्यांच्या पालकांवरही कारवाई करण्याच्या पोलिसांच्या सूचना असल्याने नागरिकांनी पतंग मांजाच्या अतिरिक्त खरेदीकडे पाठ केली आहे. सणाच्या दिवशी एखादा पतंग घेऊन आनंद साजरा करण्याची अनेकांची मानसिकता झाली आहे. त्याचप्रमाणे कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी करण्यास मज्जाव असल्याचाही परिणाम पतंगाच्या बाजारावर झाला आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

ग्रामीण भागातील व्यावसायिकांची पाठ 
शहरातील होलसेल विक्रेत्यांचा व्यवसाय ग्रामीण भागातील व्यावसायिकांवरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. यंदा बहुतांश व्यावसायिकांनीही त्याकडे पाठ फिरवली आहे. तर काही व्यावसायिक खरेदीसाठी आले. तरी त्यांचेही खरेदीचे प्रमाण दर वर्षीच्या तुलनेत कमी आहे. त्याचाही परिणाम बाजारावर झाला आहे. 

 

पाऊस, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पोलिसांची कारवाई अशा विविध कारणांनी पतंग, मांजा बाजारावर मंदीचे सावट आहे. दर वर्षी रात्री उशिरापर्यंत दुकान उघडे असते. यंदा मात्र ग्राहकच नसल्याने साडेआठ-नऊलाच दुकान बंद केले जाते. - नवाज शेख (विक्रेता)  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: turnover of kite in lakhs nashik marathi news