ह्रदयद्रावक! दोघा मित्रांच्या आयुष्यात 'ती' एक घटना अन् क्षणार्धात होत्याच नव्हतं; संपूर्ण वडाळीभोई स्तब्ध

भाऊसाहेब गोसावी
Monday, 14 September 2020

पाच मित्रांनी पर्यटनाला जाऊन पोहण्याचा आनंद घ्यायचं ठरवलं. पाचही तरुण मित्र आनंद लुटत असतानाच नियतीने दोघा मित्रांवर घाला घातला अन् होत्याचं नव्हतं झालं. दोघाही मित्रांनी आपल्या आयुष्यात वेगवेगळी स्वप्ने पाहिली अन् आता त्या स्वप्नांना सत्यात उतरवायचे, तर काळाने स्वप्नांचा अक्षरशः चुराडा केला. 

नाशिक / चांदवड : पाच मित्रांनी पर्यटनाला जाऊन पोहण्याचा आनंद घ्यायचं ठरवलं. पाचही तरुण मित्र आनंद लुटत असतानाच नियतीने दोघा मित्रांवर घाला घातला अन् होत्याचं नव्हतं झालं. दोघाही मित्रांनी आपल्या आयुष्यात वेगवेगळी स्वप्ने पाहिली अन् आता त्या स्वप्नांना सत्यात उतरवायचे, तर काळाने स्वप्नांचा अक्षरशः चुराडा केला. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

'ती' एक घटना अन् क्षणार्धात स्वप्नांचा अक्षरशः चुराडा

वडाळीभोईच्या संभाजीनगरातील दोन मित्रांचा पोहायला गेल्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी कानावर पडताच संपूर्ण वडाळीभोई स्तब्ध झाली. देवळा तालुक्यातील दहिवड (ता. देवळा) येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोघा मित्रांपैकी शुभम गुजर हा कथक नृत्यात विशारद होता. राष्ट्रीय पातळीवरील कथक नृत्य स्पर्धेत शुभमने आपला ठसा उमटविला होता. दोन वर्षांपूर्वी शुभमच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. त्याचा एक भाऊ पोलिस दलात कार्यरत आहे, तर त्याच्या मागे आई, तीन अविवाहित बहिणी, तर एक विवाहित बहीण आहे. त्याच्या मृत्यूने कथक नृत्यात करिअर करीत वडाळीभोईचे नाव देशपातळीवर उमटविण्याच्या स्वप्नाचा आज चुराडा झाला. 
त्याचप्रमाणे ऋषिकेश तोटे याने बारावी पास करून बीएस्सीमध्ये प्रवेश घेतला होता. त्याला सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करायची होती. वडाळीभोईच्या एका सैन्यभरतीपूर्व प्रशिक्षण ॲकॅडमीत त्याचा सराव सुरू होता. त्याचे वडील केद्राई पट्ट्यावर काळी-पिवळी चालवतात.

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

स्वप्नपूर्तीपूर्वीच काळाच्या फेऱ्यात; मृतदेह पाहून ग्रामस्थांचा आक्रोश 

आपला मुलगा सैन्यदलात नक्कीच भरती होईल अन् आपले स्वप्न पूर्ण करेल, असे वाटणारे त्याचे आई-वडील आज मात्र निशब्द झाले. या दोघाही मित्रांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आपल्या पोटच्या गोळ्यांचा मृतदेह पाहून त्यांचे कुटुंबीय थिजून गेले. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, माजी सभापती सुकदेव जाधव, पिंटू संचेती यांच्यासह अनेक वडाळीकरांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघाही मित्रांचे मृतदेह पाहून ग्रामस्थांनी आक्रोश केला. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा दोघाही मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.  

संपादन - ज्योती देवरे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two drowned chorchawdi vadalibhoi waterfall nashik marathi news