दुर्दैवी! मित्राला वाचवताना तो ही बुडाला; दोन जीवलग मित्रांचा मृत्यूने मुंगसे गावावर शोककळा

प्रमोद सावंत
Sunday, 1 November 2020

प्रसाद हा खंडेराव सूर्यवंशी यांचा एकुलता एक मुलगा होता. राहुलला एक भाऊ आहे. एकुलत्या एक मुलाचे व कर्त्या तरुणांच्या निधनामुळे सुर्यवंशी व सागर कुटुंबियांवर जणू काही आभाळच कोसळले आहे.

नाशिक/मालेगाव : तालुक्यातील मुंगसे-टाकळी शिवारातील कुरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा जीवलग मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता.1) दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. राहूल राजेंद्र सागर (वय 19) व प्रसाद खंडेराव सूर्यवंशी (वय 19, दोघे रा. मुंगसे) अशी या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या दुर्घटनेने मुंगसे गावावर शोककळा पसरली असून तरुणांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला पण..

मुंगसे-टाकळी व वाके या गावांच्या सीमेलगत कुरण तलाव आहे. विक्रमी पावसामुळे तलाव पुर्णपणे भरला होता. काही अंतरावर त्यांची शेती होती. आज दुपारी दोघांची भेट झाली. यानंतर दोघे जीवलग मित्र फिरत फिरत तलावात पोहण्यासाठी गेले. सफाईदारपणे पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने एकजण बुडू लागला. त्याला वाचविण्यात दुसऱ्याचाही मृत्यू झाला. नजीकच्या ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तलावाकडे धाव घेतली. तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

कृषिमंत्र्यांची रुग्णालयात जाऊन भेट

प्रसाद हा खंडेराव सूर्यवंशी यांचा एकुलता एक मुलगा होता. राहुलला एक भाऊ आहे. एकुलत्या एक मुलाचे व कर्त्या तरुणांच्या निधनामुळे सुर्यवंशी व सागर कुटुंबियांवर जणू काही आभाळच कोसळले आहे. सुमारे अर्धा तासानंतर दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. येथील सामान्य रुग्णालयात मृतदेह शवचिकित्सेसाठी आणण्यात आले. कृषिमंत्री दादा भुसे यांना या दुर्घटनेबद्दल माहिती मिळताच त्यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन तरुणांच्या आप्तेष्टांची विचारपुस केली. शवचिकित्सेनंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून मुंगसे येथे नेण्यात आले. दोघा तरुणांवर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two friends drowned while swimming nashik marathi news