बिटको रुग्णालयात वाढणार दोनशे खाटा; शंभर खाटांसाठी ऑक्सिजनची सोय 

विक्रांत मते
Friday, 2 October 2020

महापालिकेनेदेखील ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊन रुग्णांना तत्काळ उपचार मिळणार असल्याने काही प्रमाणात नियम शिथिल करून परवानगी दिली. परंतु त्यानंतर रुग्णालयांचे प्रस्ताव दाखल होण्याचे प्रमाण वाढले, तर रुग्णालयांसंदर्भात तक्रारीदेखील वाढल्याने पालिकेने एका रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला.

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णालयांची संख्यादेखील वाढू लागल्याने अखेर महापालिकेने अचानक वाढत असलेल्या रुग्णालयांच्या संख्येबद्दल आश्‍चर्य व्यक्त करताना एका खासगी रुग्णालयाची मान्यताही रद्द केली असून, रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांकडे वळविण्यासाठी आता पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. 

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढली. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये खाटा कमी पडू लागल्याने रुग्ण खासगी उपचाराकडे वळले. कोविड उपचारासाठी राखीव असलेली खासगी रुग्णालयेदेखील मध्यंतरीच्या काळात भरल्याने रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले होते. परंतु याचा फायदा घेत शहरात बंद पडलेले रुग्णालय किंवा चार ते पाच व्यक्तींनी एकत्र येऊन रुग्णालये उभारण्यास सुरवात केली. महापालिकेनेदेखील ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊन रुग्णांना तत्काळ उपचार मिळणार असल्याने काही प्रमाणात नियम शिथिल करून परवानगी दिली. परंतु त्यानंतर रुग्णालयांचे प्रस्ताव दाखल होण्याचे प्रमाण वाढले, तर रुग्णालयांसंदर्भात तक्रारीदेखील वाढल्याने पालिकेने एका रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे पालिकेने स्वतःच्या रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलताना नवीन बिटको रुग्णालयात खाटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

ऑक्सिजन खाटा वाढविणार 

सध्या बिटको रुग्णालयात पाचशे खाटा असून, त्यातील दीडशे खाटा ऑक्सिजनच्या आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन टाक्या बसविण्यात आल्यानंतर आणखी दोनशे खाटा वाढविण्यात येणार असून, त्यात शंभर खाटा ऑक्सिजनच्या राहतील. त्यानंतरच्या तिसऱ्या टप्प्यात आणखी तीनशे खाटा वाढविल्या जाणार असून, त्यात दोनशे खाटा ऑक्सिजनच्या राहणार आहे. एकूण एक हजार खाटांचे नियोजन असून, सध्या पाचशे खाटा कार्यरत आहे. पाचशे खाटांपैकी दीडशे खाटा ऑक्सिजनच्या आहेत. आणखी पाचशे खाटांचे नियोजन करताना त्यात तीनशे खाटा ऑक्सिजनच्या राहतील. 

नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात आणखी दोनशे खाटा वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यातील शंभर खाटा ऑक्सिजनसाठी राहणार आहेत. 
-कैलास जाधव (महापालिका आयुक्त, नाशिक) 

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hundred beds to be added to Bytco Hospital nashik marathi news