esakal | दुर्दैवी! युवा वयातच तरुण- तरुणीची जीवनयात्रा संपली; मालेगावात भयंकर अपघात
sakal

बोलून बातमी शोधा

bike accident shirdi.jpg

मालेगावला झालेल्या भीषण अपघातात दुचाकीच्या नंबरप्लेटचा चुराडा झाला होता. पोलिसांनी क्रमांक जुळवणी करून उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे माहिती घेतली. अपघातग्रस्तांचा मोबाईल सापडला. त्यावरून दोघांची माहिती मिळाली. 

दुर्दैवी! युवा वयातच तरुण- तरुणीची जीवनयात्रा संपली; मालेगावात भयंकर अपघात

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : मालेगावला झालेल्या भीषण अपघातात दुचाकीच्या नंबरप्लेटचा चुराडा झाला होता. पोलिसांनी क्रमांक जुळवणी करून उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे माहिती घेतली. अपघातग्रस्तांचा मोबाईल सापडला. त्यावरून दोघांची माहिती मिळाली. 

मोबाईलवरून पटली ओळख

मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या चाळीसगाव फाट्यावर भरधाव आयशरने (एमएच १८, बीजी ०११७) दुचाकीला (एमएच १९, डीए ४३५२) जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पंकज पाटील (वय २८, रा. पिंप्री, ता. चाळीसगाव) हा तरुण व त्याच्यासमवेत असलेली तरुणी असे दोघे जागीच ठार झाले. धडक जबरदस्त असल्याने तरुणाच्या डोक्याच्या एका भागाचा चेंदामेंदा झाला. मृत तरुणीची ओळख पटू शकली नाही. अपघातात दुचाकीच्या नंबरप्लेटचा चुराडा झाला होता. पोलिसांनी क्रमांक जुळवणी करून उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे माहिती घेतली. अपघातग्रस्तांचा मोबाईल सापडला. यानंतर मृत पंकजची ओळख पटली. त्याचा भाऊ चंद्रभान पाटील याने पंकज अविवाहित असल्याचे सांगितले. यामुळे पाटील कुटुंबीय घटनास्थळी आल्यानंतरच मृत तरुणीची ओळख पटू शकेल. तालुका पोलिसांत रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

भीतीपोटी ट्रकचालक पुढे निघून थांबला.

अपघातानंतर जमाव मारहाण करेल, वाहनाचे नुकसान होईल या भीतीपोटी ट्रकचालक द्रोणागिरी गोसावी (रा. अवधान, जि. धुळे) काही अंतरापर्यंत पुढे निघून थांबला. त्याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते शफीक अहमद व नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून मृतदेह सामान्य रुग्णालयात पाठविले.

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

आसिफ शेख यांचे आंदोलन 
महामार्गावर दोन आठवड्यांपासून सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे. आजच्या अपघातानंतर चाळीसगाव फाट्यावरील संतप्त जमावाला सोबत घेत चाळीसगाव फाटा व अपघातग्रस्त ठिकाणांवर गतिरोधक करावे, या मागणीसाठी माजी आमदार आसिफ शेख यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास विस्कळित झाली. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी गतिरोधक तातडीने करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चाळीसगाव फाट्यावर मोठी गर्दी झाली होती.