चोरट्यांचा थाट तरी बघा! चोरी केली तीही चारचाकीतून; फिल्मी स्टाईलमुळे परिसरात चर्चा

अजित देसाई
Wednesday, 6 January 2021

मध्यरात्रीची घटना...तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील एका दुकानाचे शटर उघडून चोरट्यांनी सुमारे दोन लाखांच्या विद्युत मोटारी व पिठाच्या घरगुती चक्क्या चोरून नेल्याची घटना घडली. चोरट्यांनी सोबत आणलेल्या चारचाकीतून चोरी केलेला माल पळवून नेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

सिन्नर (नाशिक) : मध्यरात्रीची घटना...तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील एका दुकानाचे शटर उघडून चोरट्यांनी सुमारे दोन लाखांच्या विद्युत मोटारी व पिठाच्या घरगुती चक्क्या चोरून नेल्याची घटना घडली. चोरट्यांनी सोबत आणलेल्या चारचाकीतून चोरी केलेला माल पळवून नेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

अशी आहे घटना

मंगळवारी (ता. 5) मध्यरात्रीच्या सुमारास नांदूरशिंगोटे येथील मानोरी - निमोणकडे जाणाऱ्या रस्त्यालगत व्यापारी संकुलात निलेश गडाख यांचे शिवकृपा ट्रेडर्स या नावाने विद्युत मोटारी व अन्य इलेक्ट्रिक वस्तूंचे दुकान आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन गडाख हे घरी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाचे कुलूप तोडून व शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या महागड्या मोटारी, घरघंट्या (पिठाची चक्की) व इतर वस्तू लांबविल्या. शटर वाकवण्यापूर्वी चोरट्यांनी दुकानाबाहेर असलेले दिवे बंद केले होते. सोबत आणलेल्या चारचाकीतून चोरी केलेला माल पळवून नेल्याचा अंदाज आहे. दुकानाच्या परिसरात वाहनाच्या चाकांच्या खुणा देखील उमटलेल्या दिसल्या. पहाटे शेजारी राहणाऱ्या सानप कुटुंबियांना दुकानाचे शटर उघडे दिसल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. 

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

याच दुकानाशेजारी असलेले लक्ष्मी ऍग्रो हे दुकानदेखील फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र सेंटर लॉक असल्यामुळे तिथे काही हाती लागले नाही. सकाळी वावी पोलीस ठाण्यात याबाबत कळविण्यात आल्यावर सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांनी घटनास्थळी पाहणी केली. गडाख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two lakh goods were stolen from a shop in nandurshingote nashik marathi news