बांग्लादेशींसाठी बनावट पासपोर्ट प्रकरण : मालेगावातून आणखी दोघांना अटक 

प्रमोद सावंत
Tuesday, 10 November 2020

बांगलादेशींना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी बनावट आधारकार्ड, पासपोर्ट तसेच इतर कागदपत्र बनविणाऱ्या दोन दलालांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्या दलालांकडे मालेगावातील विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व माजी आमदार आसिफ शेख यांची लेटरहेड सापडल्याने खळबळ उडाली होती.

मालेगाव (जि.नाशिक) : बांगलादेशींना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी बनावट आधारकार्ड, पासपोर्ट तसेच इतर कागदपत्र बनविणाऱ्या दोन दलालांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्या दलालांकडे मालेगावातील विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व माजी आमदार आसिफ शेख यांची लेटरहेड सापडल्याने खळबळ उडाली होती. मालेगाव शहरात दोन बांगलादेशी घुसखोर मिळून आल्यानंतर पोलिसांसमोर या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान आहे.

मालेगावला आणखी दोघांना अटक 

आयेशानगर पोलिसांनी आलम अमीन अन्सारी (वय ३८) व ताहीरअली युसूफअली (रा. नईकुलसुरी, बांगलादेश) या दोन बांगलादेशी घुसखोरांसह त्यांना बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या सहा संशयितांना अटक केली होती. एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती. सोमवारी (ता. ९) आयेशानगरचे पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी महापालिकेत मानधन तत्त्वावर काम करणारा कर्मचारी उल्हास महाले व जन्मदाखले तयार करून देणारा दलाल इश्‍तियाक अहमद या दोघांना अटक केली. यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या संशयितांची संख्या दहा झाली आहे.

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

न्यायालयात हजर करण्यात येणार

याशिवाय जहीर हाशीम हनिबा हा अन्य एक बांगलादेशी नागरिक फरारी असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. यापूर्वी शुक्रवारी अटक केलेल्या दोन बांगलादेशी घुसखोर व त्यांना मदत करणाऱ्या एकलाख अहमद मोहंमद मुस्तफा (रा. नयापुरा), इम्रान शेख रशीद (रा. नागछाप झोपडपट्टी), इकबाल खान मुनीर खान (रा. तंजीबनगर), ललित मराठे (रा. कैलासनगर) व जाकीर अली अब्दुल मजीदखान (रा. अख्तराबाद) या सहा जणांसह आठ संशयितांची पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी (ता. १०) संपणार असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two more arrested bangladeshi passport case malegaon nashik marathi news