VIDEO : ‘उभारी’च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मुख्य प्रवाहात आणणार : विभागीय आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 347 कुंटुबियांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 541 कुटुंबांना जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन त्यांना आवश्यक असणाऱ्या बाबींची नोंद घेतली आहे.

नाशिक : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यात ‘उभारी’ नावाचा उपक्रम राबवून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आत्मनिर्भर करण्याचा कार्यक्रम 2 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. 
     
यासंदर्भात विभागीय माहिती कार्यालयाशी बोलतांना गमे म्हणाले, नाशिक विभागामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या कुटुंबातील कमावती व्यक्ती गेल्यानंतर कुटुंबाची काय दुर्दशा झालेली आहे. या कठीण काळातही संबंधित कुटुंब उदरनिर्वाह कसे करते यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 347 कुंटुबियांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 541 कुटुंबांना जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन त्यांना आवश्यक असणाऱ्या बाबींची नोंद घेतली आहे. त्यामध्ये काही कुंटुबियांना विहिरीची गरज तर काहीं कुटूंबांना विहिरीसाठी वीज जोडणीची गरज आहे; तसेच कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा, मुलीच्या विवाहाची समस्या, काही ठिकाणी जमीन संदर्भात असलेल्या समस्या या सर्व बाबींची नोंद करून घेण्यात आली आहे. सर्वेक्षणात आढळून आलेल्या या सर्व समस्यांवर विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यवाही करतील. आणि त्या कुंटुबाला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना विविध योजनांचा लाभ देवून ‘उभारी’ देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

 

 

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 

     
आत्महत्याग्रस्त कुंटुबाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संबंधित कुटूंबाला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास सर्व महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यामुळे अशी कुटूंबे भविष्यात चांगले, स्वाभिमानाने व आत्मनिर्भरतेने जीवन जगू शकतील,  - राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ubhari will bring the families of suicidal farmers into the mainstream nashik news