विदेशी फटाक्यांची विक्री पडेल महागात! ऑनलाइन विक्रीवरही राहणार लक्ष

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 10 November 2020

अनेक वर्षांपासून 'डीजीएफटी'ने विदेशी फटाक्यांच्या आयातीस परवानगी दिलेली नाही. कोणत्याही देशातून फटाक्यांची आयात झाल्याची अधिकृत माहितीही उपलब्ध नाही. मात्र, तरीही देशांतर्गत बाजारात विदेशी फटाक्यांची विक्री होत असल्याचे चित्र आहे. 

नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने बैठक घेत त्यात अशा प्रकारे अनधिकृत विदेशी फटाक्यांची साठवणूक आणि विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी राज्याचे पोलिस महासंचालक, सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक आदींना निर्देश देण्याबाबत राज्य सरकारला सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सरकारने संबंधित यंत्रणांना कार्यवाहीबाबत आदेश दिले आहेत.

अनधिकृत मार्गाने येणाऱ्या फटाक्यांवर राहणार नजर

विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, तसे होत असल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. फटाका आस्थापनांची सर्वसमावेशक तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परदेशातील फटाक्यांच्या आयातीवर केंद्र सरकारने प्रतिबंध घातलेले आहेत. विदेश व्यापार महासंचालक (डीजीएफटी) यांच्या परवान्याशिवाय विदेशी फटाक्यांची आयात करता येत नाही. अनेक वर्षांपासून 'डीजीएफटी'ने विदेशी फटाक्यांच्या आयातीस परवानगी दिलेली नाही. कोणत्याही देशातून फटाक्यांची आयात झाल्याची अधिकृत माहितीही उपलब्ध नाही. मात्र, तरीही देशांतर्गत बाजारात विदेशी फटाक्यांची विक्री होत असल्याचे चित्र आहे. अनधिकृत मार्गाने हे फटाके बाजारात येत आहेत.

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

ऑनलाइन विक्रीवरही राहणार लक्ष

काही ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातूनही ऑनलाइन फटाके विक्री केली जात असल्याचे चित्र होते. काही तरुणही सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांच्या ऑर्डर नोंदवून त्यांना घरपोच फटाके विकतात. मात्र, अशा प्रकारच्या अनधिकृत विक्रीवर कारवाई करण्यात येणार आहे. विदेशी फटाक्यांबरोबरच स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेल्या फटाके विक्रीसही बंदी असून, तसे करताना आढळल्यास त्यावर कारवाई होणार आहे. भारतात विदेशी फटाकेविक्री, तसेच साठवणूक करण्यास बंदी आहे. मात्र, तरी दर वर्षी दिवाळीच्या काळात चिनी बनावटीचे फटाके बाजारात विक्रीसाठी येतात. त्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unauthorized foreign firecrackers not allowed nashik marathi news