VIDEO : शेतकऱ्याची लेक गाजविणार ‘युद्धभूमी’! नांदगावची वैशाली ठरली पहिली महिला फौजी

संजीव निकम/सचिन गायकवाड
Monday, 25 January 2021

पोलिस भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या वैशालीला खरंतर महिला पोलिस व्हायचे होते. पण, नशीब हुलकावणी देत होते. नाशिकला पंचवटी महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या वैशालीने वसतिगृहात राहून हा पल्ला गाठला. व्हायचे होते महिला पोलिस, झाली मात्र फौजी!

नांदगाव/जातेगाव (नाशिक) : नांदगाव तालुक्यातील जातेगाव म्हणजे फौजींचे गाव... भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी जातेगावातून तरुणांपैकी हमखास एखाद्या दुसऱ्याची त्यात होणारी निवड असा या जातेगावचा लौकिक...त्यात आता भर पडलीय ती वैशालीची! ती लष्करात दाखल होणारी जातेगावची पहिली कन्या तर ठरलीच; शिवाय तालुक्यातलीही पहिलीच महिला फौजी ठरली आहे. फौजींच्या गावातली शेतकऱ्याची लेक पहिलीवहिली महिला फौजी ठरली आहे. शेतकरी असलेल्या वाल्मीक पवार यांची कन्या वैशालीच्या रूपाने हा मान मिळाला आहे. 

व्हायचे होते महिला पोलिस, झाली मात्र फौजी...

दोन वर्षांपूर्वी औरंगाबादला लष्करातील भरतीसाठी वैशालीने परीक्षा दिली. नुकताच त्या परीक्षेचा निकाल लागला. पोलिस भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या वैशालीला खरंतर महिला पोलिस व्हायचे होते. पण, नशीब हुलकावणी देत होते. नाशिकला पंचवटी महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या वैशालीने वसतिगृहात राहून हा पल्ला गाठला. व्हायचे होते महिला पोलिस, झाली मात्र फौजी! लष्करातील कडक शिस्तीतील प्रशिक्षणासाठीच्या पत्राची वैशाली आता प्रतीक्षा करीत आहे. सर्वसाधारण परिस्थितीवर मात करीत वैशालीने जे यश मिळवले आहे, त्यात तिच्या आई-वडिलांचे योगदान मोलाचे होते. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

वैशालीची जिद्द व आई-वडिलांच्या पाठबळावर यश

वैशालीच्या सैन्य व पोलिस भरतीच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी आई-वडिलांचे तिला नेहमी प्रोत्साहन मिळाले. वैशालीची जिद्द व आई-वडिलांच्या पाठबळावर हे यश मिळाल्याची भावना तिने व्यक्त केली. पदवीधर असलेल्या वाल्मीक पवार यांना दोन कन्यारत्न. त्यात वैशाली थोरली. बेताचीच शेती व प्रतिकूलतेशी लढा...अशा अवस्थेत असलेल्या पवारांचे नोकरीचे स्वप्न मात्र सैन्यात भरती झालेली वैशाली पूर्ण करणार असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्प्ष्ट जाणवतोय. लेकीने नाव काढले, याचा वडिलांना अभिमान वाटतोय.  

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

(संपादन - किशोरी वाघ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaishali Pawar is first woman soldier in Nandgaon taluka nashik marathi news