सांगाल त्या पदावर, त्या ठिकाणी काम करू! गिते, बागूल यांची सेनेच्या सत्कारात ग्वाही 

विक्रांत मते
Tuesday, 12 January 2021

शिवसेना आमची आई आहे. काही दिवसांसाठी मावशीकडे राहायला गेलो होते एवढेच. राजकीय परिस्थितीमुळे पक्ष सोडावा लागला तरी आता परतलो आहे. आम्ही पक्षात आलो म्हणजे कोणाच्या पदाला धक्का लागेल असे मानू नका. सांगाल त्या पदावर, त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करू, अशी ग्वाही वसंत गिते व सुनील बागूल यांनी सोमवारी दिली. 

नाशिक : शिवसेना आमची आई आहे. काही दिवसांसाठी मावशीकडे राहायला गेलो होते एवढेच. राजकीय परिस्थितीमुळे पक्ष सोडावा लागला तरी आता परतलो आहे. आम्ही पक्षात आलो म्हणजे कोणाच्या पदाला धक्का लागेल असे मानू नका. सांगाल त्या पदावर, त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करू, अशी ग्वाही वसंत गिते व सुनील बागूल यांनी सोमवारी (ता. ११) दिली. 
गिते व बागूल दोघांनी गेल्या आठवड्यात शिवबंधन हाती बांधल्यानंतर शिवसेना भवनमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

शिवसेना आमची आई आहे. काही दिवसांसाठी मावशीकडे राहायला गेलो होतो 

प्रारंभी फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. गिते १३ वर्षांनी, तर बागूल आठ वर्षांनी शिवसेना भवनमध्ये परतले. या वेळी शिवसेना उपनेते बबन घोलप, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, महिला आघाडीच्या प्रमुख सत्यभामा गाडेकर, माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, सचिन मराठे, भाऊलाल तांबडे, योगेश बेलदार आदी उपस्थित होते. या वेळी गिते व बागूल यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आमच्याकडून ९९.९९ टक्के अडचण होणार नाही; मात्र व्यासपीठाकडे बघत आम्हालाही त्रास होऊ देऊ नका, असे आवाहन केले.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

शिवसेनेला गतवैभव प्राप्त होण्याचा विश्‍वास

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषदांवर भगवा फडकविण्याचा संकल्प करण्यात आला. श्री. घोलप म्हणाले, की शिवसेनेला आता सुगीचे दिवस आलेत. पक्षात जुना-नवा वाद निर्माण न करता शिवसेना नव्या जोमाने उभी करण्याचे आवाहन केले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सख्खे भाऊ शिवसेनेत परतल्याची भावना व्यक्त केली. गिते-बागूल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे निवडणुका जिंकणे सोपे झाल्याचा आशावाद व्यक्त करताना महानगरप्रमुख बडगुजर यांनी निवडणुकांत निष्ठावंतांचा पहिला विचार केला जाणार असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी शिवसेनेला गतवैभव प्राप्त होण्याचा विश्‍वास व्यक्त केला. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा
मावशीकडून आईकडे परतलो : गिते 
गिते म्हणाले, बारा वर्षे मी मनसेकडे म्हणजे मावशीकडे होतो. आता पुन्हा शिवसेना म्हणजे आईकडे परतलो आहे. कारस्थानांमुळे शिवसेना सोडायला लागली. पक्षनेतृत्वाने आदेश दिल्याने परतलो. चार भिंतीत बसून मनभेद व मतभेद मिटवू. आता यापुढे फक्त नाशिकच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रात भगवा फडकवू. मनसेकडून आमदार झाल्यानंतर ‘मातोश्री’वर गेलो होतो. घरातले भांडण संपविण्याची विनंती साहेबांना केली होती. (कै.) बाळासाहेबांनी धीर दिल्यानंतर मी व प्रवीण दरेकर रडलो होतो. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ‘मातोश्री’वर गेलो तेव्हा स्मृती जाग्या झाल्या. परंतु, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील आठवणी काढण्याची वेळच येऊ दिली नाही. पक्षातील भांडणे पक्षातच मिटविण्याचे आवाहन त्यांनी केले. 

शिवसेनेच्या ‘ॲक्शन’ची सवय : बागूल 
बागूल म्हणाले, की काही दिवसांसाठीच शिवसेना तुमच्याकडे सांभाळण्यासाठी दिला होता. भाजपमध्ये काम करताना सरकारी कामकाजासारखा अनुभव आला. परंतु शिवसेनेत थेट ‘अ‍ॅक्शन’ चालत असल्याने त्याची सवयच होती. माजी महापौर विनायक पांडे यांचे प्रयत्न व नगरसेवकांनी साकडे घातल्याने पुन्हा दैवताकडे म्हणजे सेनेत परतण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या कामकाजाची पद्धत लक्षात घेता शिवसेनेवर भगवा फडकवू. शिवसेना सोडायची नव्हती. मात्र काही गोष्टी हाती नव्हत्या. शिवसेनेच्या भगव्यातच मरायचे होते. आता ते साध्य करता येईल. एकत्र राहणाऱ्या चारपैकी एक भाऊ नाराज झाला तर उर्वरित तिघे भाऊ नवीन घर घेऊन देता, मात्र मला एकटे सोडल्याची भावना बागूल यांनी व्यक्त केली. व्यासपीठावर बसलेले ‘हुशार’ लोक मला जोपर्यंत परत बोलवत नाहीत तोपर्यंत मी पक्षात येऊ शकत नव्हतो.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vasant Gite sunil Bagul statement after entry in shikvsena nashik political news