'बार्टी'चे स्मार्ट वर्क!...जिल्ह्यातील ४८९ ग्रामपंचायतींच्या भेटीतून 'इतक्या' कुटुंबियांचे सर्वेक्षण..

विनोद बेदरकर
शुक्रवार, 31 जुलै 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समतादूतांनी स्वत:ची काळजी घेत तालुकास्तरावर आजाराबद्दलची जनजागृती, गरीब गरजू लोकांसाठी रेशनवाटप, रुग्णांसाठी सहकार्य, शासकीय रेशनवाटप दुकानाबाहेर गर्दी होऊ नये याकरिता सोशल डिस्टस्टिंग पाळण्याची माहिती देण्यासाठी मदत होत आहे.

नाशिक : कोरोना संकटकाळात 'बार्टी'ने स्मार्ट वर्कच्या माध्यमातून समतादूतांमार्फत विविध माहिती संकलनाचे काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावपातळीवर ५९ अनुसूचित जातींचे सर्वेक्षण समतादूतांमार्फत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात ४८९ ग्रामपंचायतींना भेटी, ऑनलाइन संपर्क करून, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून १८ हजार ११२ कुटुंबीयांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे समतादूत प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांनी सांगितले. 

समतादूतामार्फत माहिती संकलन सुरू

श्रीमती दाभाडे म्हणाले, की राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या बार्टीतर्फे अनुसूचित जातींमधील सामाजिक अथवा शासकीय कोणत्याही प्रवाहात नसलेल्या घटकांच्या नोंदीसाठी ग्रामसेवक तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या मदतीने समतादूतामार्फत माहिती संकलन सुरू आहे. लॉकडाउनच्या काळातही समतादूतांनी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात सामाजिक सलोखा, बंधुभाव निर्माण करणे, जातीय दुर्भावनांचा विध्वंस करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी जागरूकता निर्माण केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समतादूतांनी स्वत:ची काळजी घेत तालुकास्तरावर आजाराबद्दलची जनजागृती, गरीब गरजू लोकांसाठी रेशनवाटप, रुग्णांसाठी सहकार्य, शासकीय रेशनवाटप दुकानाबाहेर गर्दी होऊ नये याकरिता सोशल डिस्टस्टिंग पाळण्याची माहिती देण्यासाठी मदत होत आहे. परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी समतादूतांमार्फत मदत करण्यात आली. 

हेही वाचा > झोळीत असतानाच नियतीने हिरावले पितृछत्र...आज त्याच लेकीच्या यशाने माऊलीच्या होते डोळ्यात आनंदाश्रू

संधीचा लाभ घेण्याचे आवाहन 

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत समतादूतांनी कोरोना काळात आपल्या तालुक्यातील प्रशासनास सहकार्य करून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या सर्वेक्षणाचे काम उत्तमरीत्या सुरू असून या सर्वेक्षणातून शासनास लाभार्थी वर्ग मिळवून देण्यास अधिकच सोपे झाले. याशिवाय बार्टीमार्फत स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास यासारखे विविध ऑनलाइन क्लासेस राबवीत आहे. 'बार्टी'च्या या स्मार्टवर्कचा विद्यार्थ्यांना तसेच बेरोजगारांना निश्चितच फायदा होणार आहे, या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांनी केले.

हेही वाचा > VIDEO : आश्चर्यच! एकीकडे रुग्णांसाठी खाटांची वणवण...अन् दुसरीकडे आयसोलेशन कोचेसचा प्रशासनाला विसर?

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village level survey of 59 Scheduled Castes by Barti through Samatadoots nashik marathi news