आधीच कोरोनाचं संकट त्यात टोमॅटोवर कांजण्याचा प्रादुर्भाव

मोठाभाऊ पगार
Saturday, 8 August 2020

सध्या सर्वच शेतमालाला अत्यल्प भाव मिळत असताना टोमॅटो बरा भाव घेत आहेत. ४०० ते ५०० रुपये प्रतिक्रेट्स असा साधारणतः भाव आहे. परंतु पीक जोमात असताना या पिकावर कांजण्या रोगाने आक्रमण कले आहे.

नाशिक/ देवळा : टोमॅटोला बरा भाव असला तरी या फळपिकावर कांजण्या रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरीवर्ग हताश झाला आहे. रोगग्रस्त टोमॅटो तोडून फेकण्याचे जादा काम करावे लागत आहे.चांगल्या उत्पादनाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर असे अस्मानी व सुलतानी संकटे येत असल्याने कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

टोमॅटो फेकण्याची वेळ

सध्या सर्वच शेतमालाला अत्यल्प भाव मिळत असताना टोमॅटो बरा भाव घेत आहेत. ४०० ते ५०० रुपये प्रतिक्रेट्स असा साधारणतः भाव आहे. परंतु पीक जोमात असताना या पिकावर कांजण्या रोगाने आक्रमण केल्याने बाजारात नेण्याऐवजी टोमॅटो फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाळी विषम वातावरण, पावसाची भुरभुर यामुळे फळांवर काळे स्पॉट पडून फळ खरडेसारखे होते. फवारणी करूनही तो आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हैराण आहेत. त्यात फळमाशीमुळे फळे खराब होत असल्याने कामगंध सापळे लावत त्याचा अटकाव करण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत.

हेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

कांजण्यामुळे शंभर-सव्वाशे क्रेट्स टोमॅटो फेकली असून, इतर फळे वाचविण्यासाठी फवारणी चालू आहे. कांद्याला भाव नाही. डाळिंबावर तेल्या, मक्यावर अळी अशी सर्व बाजूने शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. आता पीक घ्यावे तरी कोणते, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 
-संजय भदाणे, कापशी (ता. देवळा) 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: virus is distroying the tomato crops in nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: