लगनमा मचाडू धूम रे धूम…सर्वांना कोरोनाचा पडला विसर, सब अलबेल..! 

गोकूळ खैरनार
Sunday, 22 November 2020

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना सर्वत्र पूर्वीप्रमाणे तोच जलसा, तोच जल्लोष, बॅंडबाजा, वाजागाजा जोरदार होता. त्यामुळे कोरोनाची ना भीती ना चिंता, ना मास्क ना सॅनिटाइजर जसे काही सगळे अलबेल, अशीच परिस्थिती बघायला मिळाली. ​

नाशिक/मालेगाव : कोरोनाच्या वैश्विक महामारीत लग्नसराई आठ महिन्यांपासून ठप्प होती. त्यातच दिवाळीनंतर आता सर्वत्र लग्नाचे बॅंड धूमधडाक्यात वाजले. यातच लग्नांमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी दिसू लागल्याने कोरोनाचा चक्क विसर पडला असून, ‘लगनमा मचाडू धूम रे धूम’ अशीच स्थिती पाहायला मिळत आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना सर्वत्र पूर्वीप्रमाणे तोच जलसा, तोच जल्लोष, बॅंडबाजा, वाजागाजा जोरदार होता. त्यामुळे कोरोनाची ना भीती ना चिंता, ना मास्क ना सॅनिटाइजर जसे काही सगळे अलबेल, अशीच परिस्थिती बघायला मिळाली. 

बॅंड पुन्हा वाजल्याने सर्वांनी आनंद 

कोरोनाच्या उद्रेकात अनेक विवाह थांबले होते. तर काहींनी पाच-पंचवीस जवळच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडले. लॉकडाउनच्या बडग्यात लग्नकार्य नसल्याने अनेकांना मोठा फटका बसला. वाजंत्री, डीजे, मंडप, लॉन्स, आचारी, वाहने यांसारख्या अनेकांचा रोजगार बुडाला. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांनी कोरोनाच्या लॉकडाउनच्या पर्वात भाजीपाला विकला, काहींनी अन्य रोजगार शोधला. 
मात्र लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाल्याने बाजारात देवाणघेवाण वाढली आहे. अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. वाजंत्री-डीजेच्या संचात दहा ते पंचवीस जण असतात. बॅंड पुन्हा वाजल्याने या सर्वांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा>> नात्याला काळिमा फासणारी घटना! अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार; मुलाला जन्म दिल्याने प्रकार उघडकीस

लग्नसराईची धूम परवडेल का?

कार्तिकी एकादशीनंतर तुलशी विवाहानंतरच लग्नांची धूम सुरू होत असते. यंदा मात्र उन्हाळी हंगाम लॉकडाउनमध्ये वाया गेल्याने आधीच लग्नाचा बार उडवून दिला जात आहे. लग्नासाठी काळजी घेऊन मोजक्या लोकांनाच परवानगी असते. ‘पुनःश्च हरिओम’ अशीच अवस्था आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार, या शक्यतेने आरोग्य विभाग सतर्क असताना लग्नसराईची धूम परवडेल का? अशी चर्चा सुज्ञ पाहुणे मंडळी करताना दिसत आहे. 

हेही वाचा>> खोदकाम करतांना सापडली सोन्याची घागर? बघायला गाव झाले गोळा; प्रत्यक्षात मात्र वेगळाच प्रकार

कोरोनाचे निर्देश पाळून आगामी विवाह सोहळ्यात बॅंड वाजविण्याचे काम घेतले आहे. आठ महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. 
- दीपक तलवारे, गायत्री बॅंड, झोडगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wedding ceremonies are being crowded again nashik marathi news