यंदा कर्तव्य आहे? तुलसी विवाहानंतर लग्नांचा धूमधडाका सुरु; हंगामात ५३ लग्नतिथी 

गोकुळ खैरनार 
Thursday, 26 November 2020

कोरोनामुळे मार्च ते मेदरम्यानचे लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आले होते. यातील काहींनी जून ते ऑक्टोबरदरम्यान साध्या पद्धतीने विवाह पार पाडले. त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या विवाह सोहळ्यांची रेलचेल तुलसीविवाहानंतर सुरू होत आहे.

मालेगाव (नाशिक): तुलसीविवाह होताच या वर्षाचा लग्नांचा हंगाम शुक्रवार (ता.२७)पासून सुरू होत आहे. नवीन हंगामात नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत दाते पंचांगानुसार ५३ दिवस लग्नतिथी आहेत. गेल्या वर्षी ५१ लग्नतिथी होते. यंदा त्यात दोनने वाढ झाली आहे. सध्या लॉकडाउनच्या काळात रखडलेल्या लग्न सोहळ्यांची दिवाळी उलटताच धूम सुरू झाली आहे. वऱ्हाडींना कोरोनाची काळजी घेतानाच लग्नसोहळ्यांना उपस्थित राहण्याची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, नवीन हंगाम सुरू झाल्याने मंडप, आचारी, लॉन्स, मंगल कार्यालय, वाजंत्री, वाढपी, फुल विक्रेते, प्रिंटिंग प्रेस आदी घटकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. 

कोरोनामुळे मार्च ते मेदरम्यानचे लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आले होते. यातील काहींनी जून ते ऑक्टोबरदरम्यान साध्या पद्धतीने विवाह पार पाडले. त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या विवाह सोहळ्यांची रेलचेल तुलसीविवाहानंतर सुरू होत आहे. लग्नसोहळ्यांमुळे बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण होऊन आर्थिक उलाढालींना गती मिळणार आहे. याशिवाय याच व्यवसायाशी निगडित घटकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍नही मार्गी लागणार आहे. विवाह समारंभ पार पाडताना वऱ्हाडींना शासकीय नियमांचे पालन करावे लागणार आहे. कोरोना जसजसा कमी होईल, तशी लग्नांची धूम वाढणार आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

वऱ्हाडींची भरउन्हात दमछाक 

तुलसीविवाहानंतर २७ नोव्हेंबरपासून लग्नसोहळे सुरू हाेत आहेत. यात खासकरून उन्हाळ्याच्या एप्रिल व मेमध्ये अनुक्रमे सात व १५ असे २२ लग्नतिथी आहेत. या महिन्यात कडक उन्हाळा असल्याने या दोन महिन्यांत वऱ्हाडीची मात्र चांगलीच दमछाक होणार आहे. 

दाते पंचांगानुसार अशा आहेत लग्नतिथी 
महिना तारीख 
नोव्हेंबर २०२० २७, ३० 
डिसेंबर २०२० ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७ 
जानेवारी २०२१ ३, ५, ६, ७, ८, ९, १० 
फेब्रुवारी २०२१ १५, १६ 
एप्रिल २०२१ २२, २४, २५, २६, २८, २९, ३० 
मे २०२१ १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ 
जून २०२१ ४, ६, १६, १९, २०, २६, २७, २८ 
जुलै २०२१ १, २, ३, १३ 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

नवीन हंगामात ५३ लग्नतिथी आहेत. १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत गुरू अस्त आहे. तसेच २१ फेब्रुवारी ते १६ एप्रिल यादरम्यान शुक्र अस्त आहे. त्यामुळे या कालावधीत लग्नतिथी नाहीत. नागरिकांनी आरोग्य, प्रशासन व शासकीय नियमांचे पालन करत लग्नसोहळे करावीत. 
- भिकन कुलकर्णी, पुरोहित, रावळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wedding events will resume after the lockdown nashik marathi news