''जिथे जिथे गुन्हेगारांचा प्रभाव दिसेल, तिथे तिथे पोलिसांच्या कारवाया'' - पोलिस आयुक्त दीपक पांडे

योगेश मोरे
Sunday, 18 October 2020

त्यावर पोलिस आयुक्तांनी ज्या चौकीत टॉयलेट नाही, अशा ठिकाणी चौकी कशी? टॉयलेट नहीं तो पोलिस चौकी नहीं, असे स्पष्ट करीत श्री. पांडे म्हणाले, की ज्या ठिकाणी महिलांचा वावर आहे, त्या ठिकाणी महिला पोलिस नियुक्त करण्यात येतील.

नाशिक : (म्हसरूळ)शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे आमचे काम आहे, त्यासाठी आवश्‍यक वाटतील त्या सर्व उपाययोजना पोलिस करतील. जिथे जिथे गुन्हेगारांचा प्रभाव दिसेल, तिथे तिथे पोलिसांच्या कारवाया होतील, असा इशारा पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला. 

आयुक्तांचा शांतता समिती बैठकीत इशारा 

प्रत्येक शनिवारी आयुक्त एका पोलिस ठाण्यास भेट देत अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. आज पंचवटी पोलिस ठाण्यात त्यांनी दिवसभर कर्मचारी व अधिकारी बैठका, स्नेहभोजन आणि शांतता समितीची बैठक घेतली. उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत आदींसह ज्येष्ठ नागरिक पद्माकर पाटील, प्राचार्य हरीश आडके, समता परिषदेचे बाळासाहेब कर्डक, माजी नगरसेविका कविता कर्डक, कल्पना पांडे, नंदू पवार, नरेश पाटील, पांडुरंग बोडके आदींसह नागरिक उपस्थित होते. 

टॉयलेट नहीं तो पोलिस चौकी नहीं 

ज्येष्ठ नागरिक पद्माकर पाटील यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यातील पोलिस चौक्या कार्यान्वित कराव्यात, अशी सूचना मांडली. त्यावर पोलिस आयुक्तांनी ज्या चौकीत टॉयलेट नाही, अशा ठिकाणी चौकी कशी? टॉयलेट नहीं तो पोलिस चौकी नहीं, असे स्पष्ट करीत श्री. पांडे म्हणाले, की ज्या ठिकाणी महिलांचा वावर आहे, त्या ठिकाणी महिला पोलिस नियुक्त करण्यात येतील. सराईतांचा उपद्रव राहील, तेथे अचानक नाकाबंदी केली जाईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामजिक अंतर ठेवणे, मास्क वापरणे, गर्दी टाळावी; अन्यथा कारवायांना सामोरे जावे लागेल. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

नागरिकांच्या अपेक्षा... आयुक्त म्हणाले...
 
- सराईत, टवाळखोरांवर कारवाई व्हावी - महिला पोलिसांचा प्रेझेंस वाढेल 
- बाहेरील पर्यटकांची लूटमार थांबवावी - गुन्हेगार शोधासाठी सरप्राइज नाकाबंदी 
- बाजार समितीत पोलिसांची संख्या वाढवा - जमावबंदीकडे दुर्लक्ष झाल्यास कारवाया 
- कौटुंबिक हिंसाचार टाळायला समुपदेशन केंद्र - दंडवसुली नव्हे वाहतुकीवर नियंत्रण  

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where there is trouble for criminals, there is police nashik marathi news