धक्कादायक! 'संपूर्ण गावच संपर्कात, कोणाचं नाव घेऊ?'  कोरोनाबाधिताच्या खुलाशाने यंत्रणेची भंबेरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जुलै 2020

कोरोना महामारीच्या संकटकाळात जशा गंभीर बाबी समोर येत आहेत तसेच काही गंभीर पण गमतीशिर प्रसंगही समोर येत आहेत. असाच एक प्रकार कसबे सुकेणे येथे उघडकीस आला. मात्र, या प्रकारात मनोरंजन कमी अन्‌ यंत्रणेची धावाधावच जास्त झाल्याने प्रसंगाचे गांभीर्यही वाढले आहे. ​

नाशिक : (कसबे सुकेणे) कोरोना महामारीच्या संकटकाळात जशा गंभीर बाबी समोर येत आहेत तसेच काही गंभीर पण गमतीशिर प्रसंगही समोर येत आहेत. असाच एक प्रकार कसबे सुकेणे येथे उघडकीस आला. मात्र, या प्रकारात मनोरंजन कमी अन्‌ यंत्रणेची धावाधावच जास्त झाल्याने प्रसंगाचे गांभीर्यही वाढले आहे. 

असा आहे प्रकार

कसबे सुकेणे येथील एका प्रतिष्ठित परिवारातील व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या ६४ वर्षीय वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित कुटुंबीय काही दिवसांपूर्वी घोटी-इगतपुरी येथे एका विवाह सोहळ्यास उपस्थित होते. तेथून परतल्यानंतर तीन दिवसांनी संबंधित वृद्धाला त्रास जाणवल्याने पिंपळगाव बसवंत येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. तेथून पाठवलेल्या स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर नाशिकमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्या संपर्कात कोण कोण आले, याची माहिती घेत असताना त्यांनी 'संपूर्ण गावच माझ्या संपर्कात आहे. मी कोणाचे नाव घेऊ' असे उत्तर दिले. 

प्रशासन चिंतेत

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वैभव पाटील व त्यांचे सहकारी आणि एकूणच संपूर्ण यंत्रणा विचारात पडली आहे. त्यातच, आधीच प्रतिबंधित क्षेत्र वाढत असलेल्या संपूर्ण गावालाच प्रतिबंधित करावे लागते की काय, अशी भीती प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरोना कमिटी व ग्रामपंचायत प्रशासनाला सतावत होती. मात्र, त्यातून मार्ग काढत अखेर त्यांचे कुटुंबीय व विवाह सोहळ्यानंतरच्या तीन दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना खासगी रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

हेही वाचा > खून झालेल्या युवकावर बलात्काराचा गुन्हा..? युवती गर्भवती राहिल्याने झाला खुलासा

तीन दिवस जनता कर्फ्यू 

दरम्यान, कसबे सुकेणे गावात सातत्याने कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे गाव सध्या रेड झोनमध्ये असून, आणखी रुग्ण वाढू नयेत, एकमेकांचा संपर्क होऊ नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा > ‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे..

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The whole village came in contact with me, the shocking information of a corona positive old man nashik marathi news