esakal | 'इगतपुरी-मनमाड रेल्वेमार्ग रुंदीकरणाला जमिनी देणार नाही!'...भूसंपादनाच्या नोटिसांमुळे शेतकऱ्यांत उद्रेक
sakal

बोलून बातमी शोधा

train.png

शासनाने त्याप्रमाणे अधिकृत नोटीस प्रसिद्ध करीत पंधरा दिवसांचा कालावधी शेतकऱ्यांना हरकतीसाठी दिला आहे. एका बाजूला लॉकडाउनच्या संचारबंदीच्या नावाखाली  शेतकऱ्यांची कोंडी करताना दुसरीकडे १५ दिवसांत गुपचूप संपादन उरकण्याच्या प्रशासकीय हालचालींना स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे.

'इगतपुरी-मनमाड रेल्वेमार्ग रुंदीकरणाला जमिनी देणार नाही!'...भूसंपादनाच्या नोटिसांमुळे शेतकऱ्यांत उद्रेक

sakal_logo
By
ज्ञानेश्वर गुळवे

नाशिक : (अस्वली स्टेशन) इगतपुरी ते मनमाड रेल्वेमार्गाचे रुंदीकरण तिसऱ्या व चौथ्या ब्रॉडगेज लाइनचे बांधकाम व विद्युतीकरणाच्या प्रस्तावित रेल्वे प्रशासनाच्या प्रकल्पासाठी  एकट्या बेलगाव कुऱ्हे एकूण २,७७३ आर जमीन संपादित करण्यासाठी महसूल यंत्रणेकडून शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. दरम्यान, लॉकडाउनमुळे विविध समस्यांनी हैराण शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध दर्शविला आहे.

कुठल्याही परिस्थितीत जमिनी न देण्याचा निर्णय
 
इगतपुरी तालुक्यातून बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य, कुऱ्हेगाव, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख, वंजारवाडी, लोहशिंगवे आदी गावांतील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी प्रकल्पासाठी संपादित  होणार आहेत. शासनाने त्याप्रमाणे अधिकृत नोटीस प्रसिद्ध करीत पंधरा दिवसांचा कालावधी शेतकऱ्यांना हरकतीसाठी दिला आहे. एका बाजूला लॉकडाउनच्या संचारबंदीच्या नावाखाली  शेतकऱ्यांची कोंडी करताना दुसरीकडे १५ दिवसांत गुपचूप संपादन उरकण्याच्या प्रशासकीय हालचालींना स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. भूसंपादनाच्या नोटिसांनंतर या भागातील बाधित शेतकऱ्यांनी संयुक्तरीत्या बैठका घेत रेल्वेच्या प्रकल्पासाठी कुठल्याही परिस्थितीत जमिनी न देण्याचा निर्णय घेत प्रकल्पासाठीच तीव्र विरोध दर्शविला आहे. 

तर गाव पूर्णतः भूमिहीन होणार

इगतपुरी तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी भुसावळ-मुंबई मध्य रेल्वे, केंद्रीय संरक्षण खाते, नाशिक-मुंबई महामार्ग, पाटबंधारे विभाग, औद्योगिक क्षेत्र, घोटी-सिन्नर शिर्डी महामार्ग,  मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग यांसारख्या शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी संपादित झालेल्या आहेत. केंद्रीय संरक्षण खात्याने लष्कराच्या गोळीबार सरावासाठी यापूर्वीच सुमारे ९० टक्के  जमीन संपादित झाल्याने बेलगाव कुऱ्हे गाव पूर्णतः प्रकल्पग्रस्त आणि भूमिहीन झालेले आहे. आता बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांकडे शिल्लक जमिनीही संपादित झाल्या, तर गाव पूर्णतः भूमिहीन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अस्तित्वासाठी शेतकऱ्यांचा विरोध रास्त आहे, असे प्रकल्पग्रस्त शेतकरी, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. संदीप गुळवे यांनी  सांगितले. 

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

संरक्षण खात्याने लष्कराच्या सरावासाठी सरकारी दराने बेलगाव कुऱ्हेची शेकडो हेक्टर जमीन संपादित केल्याने पूर्णतः गाव अल्पभूधारक आहे. उर्वरित राहिलेल्या जमिनीही शासन  प्रस्तावित प्रकल्पासाठी संपादित करीत असेल, तर भविष्यात शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. प्रसंगी जिवाचे बलिदान देऊ; परंतु कुठल्याही प्रकारे जमिनी प्रकल्पासाठी संपादित होऊ देणार नाही. - नंदराज गुळवे, सरपंच- बेलगाव कुऱ्हे 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ