जेईई मेन्सच्या गोंधळाची पुनरावृत्ती टळणार का? जिल्ह्यात ४४ परीक्षा केंद्रांवर 'नीट' परीक्षा

jee exam.png
jee exam.png

नाशिक : जेईई मेन्स परीक्षेवेळी विद्यार्थ्यांची झालेली गैरसोय त्यातून प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या संख्येवर झालेला परिणाम, प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत सुरू असलेला आजअखेरपर्यंतचा गोंधळ पाहता रविवारी (ता.१३) होणाऱ्या नीट परीक्षेच्यावेळी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीसह संबंधित यंत्रणेला विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने वाहन व्यवस्थेचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागणार आहे. लाल फितीचा कारभार झाल्यास जेईई मेन्सची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. 

४४ परीक्षा केंद्रांवर रविवारी नीट परीक्षा 

जेईई मेन्स परीक्षेनंतर आता वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नॅशनल इलिजिब्लिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा रविवारी (ता.१३) देशभरात होणार आहे. या परीक्षेसाठी नाशिक क्षेत्रात ४४ परीक्षा केंद्रे असून, शहरातील परीक्षा केंद्रांसह सटाणा, मालेगावलाही केंद्रे असणार आहेत. सुमारे १६ हजार विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट असतील. नुकत्याच झालेल्या जेईई मेन्स परीक्षेसाठी नाशिकमध्ये केवळ पाच परीक्षा केंद्रे होती. दोन सत्रांमध्ये सहा दिवस ही परीक्षा पार पडली. परंतु ‘नीट’ परीक्षेला एकाच दिवशी व एकाच वेळी सुमारे सोळा हजार विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. 

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोचण्याचे आव्हान

सुरक्षिततेची बाब म्हणून परीक्षा केंद्रांवर मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आदी बाबींची खबरदारी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या असून, यामुळे संभाव्य गर्दी टळणार आहे. परंतु परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोचण्याचे आव्हान असणार आहे. नीट परीक्षेच्या माध्यमातून एमबीबीएस, बीडीएस यांसह अन्य विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे. 

वाहतुकीचे नियोजन आवश्यक 

जेईई मेन्सची परीक्षा देण्यासाठी अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून आपापल्या वाहनाने आले होते. एनटीएसाठी नागपूर व मुंबई येथे परीक्षा केंद्र असताना रेल्वे विभागातर्फे ऐन परीक्षेच्या तोंडावर विशेष रेल्वेगाड्यांची माहिती जारी करण्यात आली होती. त्यापूर्वीच अनेक विद्यार्थी खासगी वाहनाने परीक्षा केंद्राच्या शहराकडे रवाना झाले होते. या दोन घटनांचा अनुभव लक्षात घेता, नीट परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत सहज व सुलभरीत्या पोहोचता यावे, याकरिता राज्य परिवहन महामंडळातर्फे अतिरिक्त बसगाड्या उपलब्ध करून देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. 

दोन परीक्षा केंद्रांमध्ये बदल 

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे गुरुवारी (ता.१०) परिपत्रक जारी करीत नाशिकमधील दोन परीक्षा केंद्रांमध्ये बदल करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार यापूर्वी जाहीर केलेल्या भावली (ता. इगतपुरी) येथील एकलव्य निवासी शाळा येथील परीक्षा केंद्रात बदल करण्यात आला आहे. या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांची परीक्षा साउथ देवळाली येथील केंद्रीय विद्यालय (एअर फोर्स स्टेशन) येथे घेतली जाणार आहे. तसेच बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या सटाणा येथील इंग्लिश मीडियम स्कूल या परीक्षा केंद्रावरील विद्यालयांची आसन व्यवस्था नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील सरस्वतीनगर येथील के. के. वाघ स्कूल येथे करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांसाठीही वाहन व्यवस्था गरजेची आहे. या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांनी अद्ययावत प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन ‘एसटीए’ने केले आहे.  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com