वाइन विक्रीचा हंगाम रुळावर! ‘वीक एंड’ला अनेक ग्राहक चाखताएत वाईनची चव

महेंद्र महाजन
Tuesday, 20 October 2020

वाइनचा हंगाम सुरु झालेला असताना विक्री रुळावर आली आहे. महाराष्ट्राप्रमाणे तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली, हरियानामध्ये गेल्या दोन महिन्यांत गेल्यावर्षीच्या जवळपास व्यवसाय झाल्याचे उत्पादकांच्या निदर्शनास आलंय. 

नाशिक : वाइनचा हंगाम सुरु झालेला असताना विक्री रुळावर आली आहे. महाराष्ट्राप्रमाणे तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली, हरियानामध्ये गेल्या दोन महिन्यांत गेल्यावर्षीच्या जवळपास व्यवसाय झाल्याचे उत्पादकांच्या निदर्शनास आलंय. वाइन टुरिझमला प्रोत्साहन देणाऱ्या नाशिकमधील सुला विनियार्डच्या टेस्टींग रुमसह रेस्टॉरंट खवय्यांनी फुलून निघत आहे. ‘वीक एंड’ला सरासरी दीड हजाराहून अधिक ग्राहक वाइनची चव चाखत आहेत. 

वाइन विक्रीचा हंगाम रुळावर 
कर्नाटक आणि दिल्लीमध्ये दुकानाच्या समोर वाइन पिण्यास ग्राहक पसंती देतात. त्यामुळे तेथील रेस्टॉरंटला मनुष्यबळाच्या चणचणीला सामोरे जावे लागले नाही. मात्र, नाशिकसह महाराष्ट्रात हॉटेल इंडस्ट्रीजला स्वयंपाकीपासून ते इतर मनुष्यबळाच्या उपलब्धतेच्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. पश्‍चिम बंगालमधून येणाऱ्या कारागिरांना आणण्यासाठी रेल्वे, विमानांची तिकीटे ‘बुक’ करण्यात आली. मात्र वेळेवर रेल्वे, विमान रद्द झाल्याच्या प्रसंगाला व्यावसायिकांना तोंड द्यावे लागले. अखेर विमानाने कारागिरांना पुण्यापर्यंत आणून पुण्यातून चारचाकीमधून नाशिकला आणले गेले. विशेष म्हणजे, स्थानिक मनुष्यबळ पुन्हा आपल्या पूर्वीच्या कामाकडे फिरकायला तयार नाही. उद्योग क्षेत्रात काही जणांना रोजंदारीवर नोकरी पत्करली. आता पुन्हा कामावर येण्यासाठी दिवाळीच्या बोनसपर्यंत थांबावे असे सांगत आहेत. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

इतर राज्यातून प्रतिसाद 
हॉस्पिटॅलिटीमध्ये आवश्‍यक असलेल्या मनुष्यबळाच्या मागणीची माहिती डिजीटल माध्यमातून प्रसारित केली जात आहे. त्यास इतर राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. मात्र स्थानिक तरुण हॉस्पिटॅलिटीमध्ये काम करण्यासाठी उत्सुक नाहीत. इतर राज्यातून मनुष्यबळ येण्याची वाट पाहण्याऐवजी स्थानिकांना कामावर येण्याबद्दल सूचवले जात आहे. मात्र अनेकजण घरचे कामावर जाऊ नकोस असे म्हणत असल्याचे कारण ऐकावयास मिळत आहे. एकुणात काय, तर दोनशे मनुष्यबळाची गरज असलेल्या ठिकाणी ९० ते ९५ जणांवर हॉस्पिटॅलिटी पुढे न्यावी लागत आहे. अशातच, ऑनलाइन वाइन विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे घरगुती वाइनची चव चाखण्याचा आनंद घेणाऱयांची संख्या घटल्याचे व्यावसायिक सांगताहेत. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

दुकानातून ९० टक्के विक्री 
सर्वसाधारपणे दुकानातून ६५ टक्के, तर हॉटेल-बारमधून ३५ टक्के वाइनची विक्री होते. मधल्या निर्बंधाच्या काळात दुकानातून ९० टक्के वाइनची विक्री झाली. ऑनलाइनचा वापर करुन घरी वाइन मागवण्याचे प्रमाण वाढेल असा अंदाज बांधण्यात आला होता. पण प्रत्यक्षात बहुतांश ग्राहकांनी दुकानात जाऊन वाइनची खरेदीस पसंती दिली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wine sales increased in season nashik marathi news