धक्कादायक! विज्‍डम हाय शाळेकडून पालकांकडे आयटीआर, बँक स्‍टेटमेंटची मागणी; पालकांमध्ये तीव्र संताप

अरुण मलाणी
Thursday, 7 January 2021

स्कूलतर्फे चक्‍क पालकांकडून आयकर आवेदन (आयटीआर) भरल्‍याचा तपशील, बँक खात्‍याच्या स्‍टेटमेंटची मागणी केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्‍या या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप व्‍यक्‍त होत आहे. पालकांच्‍या या खासगी तपशिलाशी शाळेचा काय संबंध, असा प्रश्‍न उपस्‍थित करताना शाळेच्‍या या निर्णयावर पालकांनी आक्षेप नोंदविला आहे. 

नाशिक : येथील विज्‍डम हाय ग्रुप ऑफ स्कूलतर्फे चक्‍क पालकांकडून आयकर आवेदन (आयटीआर) भरल्‍याचा तपशील, बँक खात्‍याच्या स्‍टेटमेंटची मागणी केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्‍या या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप व्‍यक्‍त होत आहे. पालकांच्‍या या खासगी तपशिलाशी शाळेचा काय संबंध, असा प्रश्‍न उपस्‍थित करताना शाळेच्‍या या निर्णयावर पालकांनी आक्षेप नोंदविला आहे. 

पालकांनी आंदोलन छेडण्याचा पावित्रा

कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे यंदा शाळा आणि पालक यांच्‍यातील संघर्ष सुरूच असल्‍याचे चित्र आहे. यापूर्वी ऑनलाइन अध्ययन सुरू असताना, अनेक कारणांनी जादाचे शुल्‍क भरण्यास पालकांनी विरोध दर्शविला आहे. प्रसंगी शालेय प्रांगणात पालकांनी आंदोलन छेडण्याचा पावित्रादेखील घेतला आहे. त्‍यातच आणखी एक धक्‍कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. विज्‍डम हाय ग्रुप ऑफ स्‍कूलतर्फे काही पालकांना ‘फायनान्‍शियल असिस्‍टन्‍स ॲप्लिकेशन’ असा एक अर्ज पाठविण्यात आला आहे. यात विद्यार्थ्याच्‍या माहितीच्‍या तपशिलासह पालक (आई आणि वडील) काम करत असलेल्‍या कंपनीचे नाव, पत्ता, तेथील संपर्क क्रमांक नमूद केला आहे. शुल्‍क भरू शकत नसल्‍याचे कारण या अर्जात विचारले आहे. व्‍यवसायाचे किती नुकसान झाले आहे किंवा नोकरी कधीपासून सुटली आहे, असे संवेदनशील प्रश्‍नदेखील यात विचारले आहेत. 

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

या बाबींना आहे पालकांचा आक्षेप 
आगामी काळात कधीपर्यंत शुल्‍क भरणे शक्‍य आहे, याबद्दलची माहितीदेखील पालकांना भरण्यास सांगितली आहे. इतकेच नव्‍हे, तर संतापजनक बाब म्‍हणजे या अर्जासोबत पालकांना त्‍यांच्‍या बँक खात्‍याचा सहा महिन्‍यांचा तपशील (बँक स्‍टेटमेंट), आर्थिक वर्ष २०१९-२० करिता प्राप्तिकर विभागाचे आवेदनपत्र (आयटीआर), नोकरी गेली असल्‍याचा संबंधित कंपनीचे पत्र जोडण्यास सांगितले आहे. या सर्व बाबींना पालकांनी आक्षेप घेतला आहे. शासनाने जारी केलेल्‍या परिपत्रकानुसार पालकांना शुल्‍क भरण्यासाठी अवधी उपलब्‍ध करून देणे अपेक्षित असताना, शालेय प्रशासनाकडून चुकीच्‍या पद्धतीने अर्थ काढला जात असल्‍याचे पालकांचे म्‍हणणे आहे. 

हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड 

सवलत देण्यासाठी मागविली माहिती : शालेय प्रशासन 

यासंदर्भात शालेय प्रशासनाशी संपर्क साधला असता, मुख्याध्यापिका श्रीमती चव्‍हाण यांनी सांगितले, की शासन निर्णयानुसार आम्‍ही पालकांना शुल्‍क भरण्यासाठी सवलत देतो आहोत. परंतू, बरोबर गरजू पालक कोण आहेत, याची ओळख कशी पटणार हा प्रश्‍न आहे. त्‍यामुळेच ज्‍यांना शुल्‍कात सवलत किंवा सुलभ हप्त्यांत शुल्‍क भरायाचे आहे, अशा पालकांकडून तपशील मागविला आहे. या माहितीच्‍या आधारे गरजू पालकांना मदत करण्याची शाळेची भूमिका आहे. शुल्‍क अदा केलेल्‍या पालकांची कुठलीही माहिती मागविलेली नसल्‍याचे स्‍पष्टीकरण दिलेले आहे. 
 

पालकांचा आर्थिकविषयक तपशील विचारणा करण्याचा शाळेला अधिकार नाही. आधीच पालक कोविड-१९ मुळे आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना, त्‍यांच्‍या जखमेवर मीठ चोळण्याचे काम विज्‍डम हायस्‍कूल प्रशासनाने केले आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत पालकांवरील अन्‍याय संघटनेमार्फत दूर करू. - आदित्‍य बोरस्‍ते, महानगरप्रमुख, युवासेना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wisdom High School demands ITR bank statement from parents nashik marathi news