समृद्धी महामार्गाच्या कामाला 'ब्रेक'...उद्दिष्ट पूर्ण होण्यावर प्रश्‍नचिन्हच!

samrudhi mahamarg.jpg
samrudhi mahamarg.jpg

नाशिक : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ताकाळातील ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला ब्रेक लागला आहे. कोरोनामुळे स्थलांतरित झालेले मजूर व ग्रामीण भागातही कोरोनाचा झालेला शिरकाव त्यासाठी कारणीभूत ठरला असून, इगतपुरी ते शहापूरदरम्यानच्या कामासाठी शंभर-सव्वाशे नव्हे, तर तब्बल एक हजार 400 मजुरांची मागणी नोंदविण्यात आली आहे. हीच स्थिती कमी-अधिक प्रमाणात महामार्गाच्या 16 टप्प्यांतील कामावर असून, प्रत्येक ठिकाणी 60 टक्के मजुरांची आवश्‍यकता भासत असल्याची माहिती समोर आली आहे. 

मजूर स्थलांतरित झाल्याचा परिणाम

मुंबई ते नागपूरला जोडणाऱ्या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम भाजप सरकारच्या काळात सप्टेंबर 2019 मध्ये सुरू झाले. या कामाचे 16 टप्पे करण्यात आले आहेत. यातील 13 ते 15 हे टप्पे नाशिक जिल्ह्यातून, तर सोळावा टप्पा ठाणे जिल्ह्यातील कसारा ते शहापूरदरम्यान आहे. राज्याच्या दहा जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गावर 120 मीटर रुंदीचे सहापदरी महामार्ग, 120 ते 150 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालविण्याची क्षमता व 18 नवनगरे वसविली जाणार आहेत.

ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव अन् धास्ती

संपूर्ण महामार्गाचे काम 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ऍप्कॉस कंपनीला देण्यात आले आहे. जलदगतीने काम सुरू असताना एप्रिल व मेमध्ये महामार्गाचे काम थांबविण्यात आले होते. त्यानंतर सोशल डिस्टन्स ठेवत कामाला सुरवात झाली; परंतु याचदरम्यान महामार्गावर काम करणाऱ्या उत्तर भारतीय मजुरांनी गावाकडे स्थलांतर केले. सध्या जे मजूर काम करत आहेत, त्यांनी ग्रामीण भागात शिरकाव झालेल्या कोरोनाची धास्ती घेतली. तेदेखील काम सोडून गावाकडे जाण्याची तयारी करत असल्याने महामार्गाच्या कामाला ब्रेक लागला आहे. 

उद्दिष्ट पूर्ण होण्यावर प्रश्‍नचिन्ह 

महामार्गाचे काम पूर्वपदावर आणण्यासाठी एक हजार 400 मजुरांची आवश्‍यकता आहे. सध्या टप्पा क्रमांक 15 व 16 मध्ये अवघे तीनशे मजूर काम करत असून, हे प्रमाण 40 टक्के आहे. त्यामुळे आणखी 60 टक्के मजुरांचा ठाणे व नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात शोध घेतला जात आहे. लॉकडाउनमधील सुरवातीचे दोन महिने व आता मजुरांची कमतरता भासू लागल्याने काम बंद पडले आहे. त्यामुळे 2022 पर्यंत महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आहे. मजुरांची कमतरता डिसेंबरअखेरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com