esakal | मसालाकिंगच्या मदतीने दुबईतील कामगार महाराष्ट्रात...मराठी कामगारांना मोठा दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown labour.jpg

कोविड १९ साथ व लॉकडाऊनमुळे दुबईत अडकून पडलेल्या गरीब मराठी कामगारांना मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. रोजगार गमावल्याने निर्धन झालेल्या तसेच निवारा गमावलेल्या १८६ महाराष्ट्रीय कामगारांची पहिली तुकडी नुकतीच दुबईतून चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत परतली आहे. 

मसालाकिंगच्या मदतीने दुबईतील कामगार महाराष्ट्रात...मराठी कामगारांना मोठा दिलासा

sakal_logo
By
प्रशांत कोतकर : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोविड १९ साथ व लॉकडाऊनमुळे दुबईत अडकून पडलेल्या गरीब मराठी कामगारांना मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. रोजगार गमावल्याने निर्धन झालेल्या तसेच निवारा गमावलेल्या १८६ महाराष्ट्रीय कामगारांची पहिली तुकडी नुकतीच दुबईतून चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत परतली आहे. त्यांचा परतीच्या प्रवासाचा सर्व खर्च डॉ. दातार यांच्या अल अदिल ट्रेडिंग कंपनीने उचलला आहे. 

जवळपास ६५ हजार लोक दुबईत अडकून
डॉ. दातार म्हणाले, “दुबईतील लॉकडाऊन संपल्यावर अमिरातीतून भारतापर्यंत विमान वाहतूक पूर्ववत झाली. मात्र दुबई ते मुंबईदरम्यानची उड्डाणे अगदी अलिकडेच सुरू झाली. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातून रोजगार, शिक्षण, पर्यटन यासाठी गेलेले जवळपास ६५ हजार लोक दुबईत अडकून पडले आहेत. त्यामध्ये रोजगारवंचित झालेल्या व पैशाअभावी निवारा गमावलेल्या कामगारांची संख्याही मोठी आहे. आमच्या अल अदील कंपनीने सामाजिक बांधीलकीचा भाग म्हणून अशा गरजू भारतीयांना स्वखर्चाने मायदेशी पोचवण्याची मोहीम हाती घेतली. याआधी लॉकडाऊनच्या काळात आम्ही हजारो कुटूंबांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, औषधे व जंतुनाशकांचे संच मोफत पुरवले होते. संकटग्रस्त भारतीयांची घरी लवकर परतण्याची ओढ लक्षात घेऊन आम्ही निर्धन कामगारांचा विमान तिकीटाचा, तसेच वैद्यकीय चाचणीचा खर्च उचलण्याचे ठरवले. केरळ, तमीळनाडू, पंजाब, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील ३००० हून अधिक गरजू बांधवांना आम्ही भारतात घरी सुखरुप पोचण्यासाठी मदत केली. त्यासाठी ३ कोटी रुपयांहून अधिक खर्च आला.” 

मसालाकिंगची मदतीने दुबईतील कामगार महाराष्ट्रात 

ते पुढे म्हणाले, “ मोफत विमान तिकीट देताना खऱोखर गरजूंची निवड करण्याचे आव्हान आमच्यापुढे उभे होते. त्याबरोबर इतरही काही महत्त्वाची कामे करणे गरजेचे होते. मराठी कामगारांना सुखरुप घरी पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची परवानगी मिळवणे, त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करणे, दुबईतील भारतीय कॉन्सुलेटशी समन्वय राखणे, अमिरात व भारत या दोन्ही देशांच्या कायद्याची चौकट पाळणे, चार्टर्ड फ्लाईटसाठी विमान कंपनीशी संपर्कात राहणे आदींचा त्यात समावेश होता. प्रवास व वैद्यकीय खर्चाबरोबरच प्रवाशांच्या होम क्वारंटाइनची जबाबदारीही उचलायची होती. अल अदील कंपनीच्या वतीने संचालक सौ. वंदना दातार, हृषिकेश दातार व रोहित दातार यांनी आणि प्रवाशांच्या प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या धनश्री पाटील यांनी समन्वयाचे, प्रवासी निवडीचे काम केले. 

हेही वाचा > आयुक्तांची रात्री उशिरा रुग्णालयात एंट्री...चौकशीत मोठा खुलासा...नेमके काय घडले?

आमच्याशी संपर्क साधावा : दातार 
परवानेविषयक औपचारिकता पूर्ण करण्यात राहुल तीळपुळे व अकबरअली ट्रॅव्हल्सचे सुलेमान यांची मदत झाली. रोजगारवंचित कामगारांपैकी ज्यांचे मासिक वेतन २००० दिऱ्हॅमपेक्षा कमी होते अशा २००० व्यक्तींची यादी करुन त्यातून १८६ मराठी कामगारांची निवड करण्यात आली. हे कामगार संपूर्ण महाराष्ट्रभरातील आहेत. ज्या गरजूंना या अर्थसाह्याची गरज आहे त्यांनी स्वतः किंवा भारतातील नातलगांमार्फत आमच्याशी संपर्क साधावा. 

हेही वाचा > हायटेक सल्ला पडला महागात; दोन एकरांतील ऊस जळून खाक...नेमके काय घडले?