ही दोस्ती तुटायची नाय! आदिवासी पाडयावरील योगिताची कोकरुशी जडली गट्टी; पाहा VIDEO

आनंद बोरा
Friday, 20 November 2020

काही दिवसांपूर्वी योगिताच्या घरी शेळीने कोकरूला जन्म दिला. कोकरू या मुलीचा जिगरी दोस्त बनून गेला. प्रेम दिल्याने प्रेम मिळते हे ह्या मुलीने सिद्ध करून दाखविले आहे.

नाशिक : हरसूलजवळील खरपडी पाडा अगदी इतर पाड्यांसारखाच आहे. पण या गावातील एक मुलगी मात्र या सर्व पाड्यांमध्ये वेगळी आहे. काय आहे तिचे वेगळेपण हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल...प्राण्यांना बोलता येत नाही. मात्र तरीही ते संवाद साधतात. फक्त आपल्याला त्यांचे संकेत आणि देहबोली समजायला हवी. एकदा का आपल्याला हे जमलं की मग माणसांशीही नेमका संवाद साधण्यास मदत होते. असाच अनोखा संवाद साधलाय योगिता ठाकरे या मुलीने...

कोकरू या मुलीचा जिगरी दोस्तच...

सहावीत शिक्षण घेणारी योगिता कोरोना महामारीच्या संकटामुळे सहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मित्र-मैत्रीणींपासून ती दूरच आहे. गावात मोबाईलला रेंज नसल्यामुळे अभ्यासदेखील करता येत नाही. घरात राहून घरकाम करायचे आणि शेतात आईबरोबर देखील कामाला जायचे असे तिचा नित्यकर्म चालू. काही दिवसांपूर्वी योगिताच्या घरी शेळीने कोकरूला जन्म दिला. कोकरू या मुलीचा जिगरी दोस्त बनून गेला. प्रेम दिल्याने प्रेम मिळते हे ह्या मुलीने सिद्ध करून दाखविले आहे. कोकरूला आंघोळ घालणे, त्याचे केस विंचरणे, पावडर लावणे, टीका लावून चक्क लिपस्टिकदेखील ती त्या कोकरूला लावते.

मनुष्य आणि प्राणी यांच्यात घट्ट नातं

योगिता जिथे जाईल तिथे ते कोकरू तिच्या पाठीमागे टनाटन उड्या फिरते. तिच्याशी संवाद देखील साधते. तिच्याबरोबर खेळते मस्ती करते. योगिताला कुणी मारले तर ते अंगावर धावून जाते. त्या कोकरूची भाषादेखील जणू आता योगिता समजू लागली आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे की पाळीव प्राण्यासोबत खेळताना आपल्या शरीरात ऑक्सीटोसीन तयार होत असतं. हे हॉर्मोन मेंदू शांत होण्यास मदत करतं. त्यामुळे चिंता आणि ताण कमी होतो. इतकंच नाही तर शरीरात ऑक्सिटोसीन तयार होत असल्याचं प्राण्यांनाही जाणवतं. त्यामुळे मनुष्य आणि प्राणी यांच्यात घट्ट नातं तयार होण्यास मदत होते.

हेही वाचा > संतापजनक! २० वर्षीय दिव्यांग विद्यार्थ्यावर अत्याचार; प्राचार्य विरोधात गुन्हा दाखल

आपले आरोग्यदेखील उत्तम राहते. यामुळे आता कोरोना काळात मुक्या प्राण्यांशी मैत्री करायला हवी असे प्राणीमित्र सांगतात. शब्दांशिवायच्या संवादाचे तज्ज्ञ डॉ. अलबर्ट मेहराबियन सांगतात की, "आपण रोज 60% ते 90% संवाद न बोलता साधत असतो." म्हणजे विचार करा, हे संवाद कौशल्य तुम्ही मुक्या प्राण्यामुळेच आत्मसात करू शकलात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yogita from a tribal family became friends with a goat nashik marathi news