पोलीस असल्याचे भासवून खंडणीसाठी युवकाचे अपहरण; २ संशयितांना अटक

रोशन खैरनार
Thursday, 8 October 2020

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून शहर व तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

नाशिक/सटाणा : येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील दोधेश्वर नाक्यावर चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या युवकास चौघांनी पोलीस असल्याचे भासवून धाक दाखवत बळजबरीने गाडीत बसवलत मंगळवारी (ता.6) रोजी भरदुपारी अपहरण केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून शहर व तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

मी पोलिस आहे, तुझ्या घरी फोन लाव’

सनी धनंजय आहिरे (वय 27, रा.मुळाणे, ता.बागलाण)  हा शहरातील दोधेश्वर नाक्यावर तो चायनीज हातगाड्याचा व्यवसाय करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. मंगळवारी (ता.6) रोजी दुपारी दोन वाजता नेहमीप्रमाणे त्याने गाडा लावला. पावणे तीन वाजता एक पांढर्‍या रंगाचे तवेरा (क्रमांक माहीत नाही) चारचाकी वाहन त्याच्या दुकानाजवळ आले आणि वाहनातील विकी गुर्जर (वय 29) याने सनीची कॉलर पकडून बळजबरीने वाहनात बसविले. यावेळी वाहनाचा चालक असलेल्या जयेश जाधव (वय 27) यालाही त्याने ओळखले. यानंतर त्यांनी सनीला मालेगाव रस्तामार्गे आघार रावळगाव फाटा येथे नेले. तेथे त्यांचे आणखी दोन मित्रही वाहनात बसले. संवादावरुन एकाचे नाव पोलार्ड तर दुसर्‍याचे नाव जाधव (दोघांचे वय माहीत नाही) असल्याचे समजले. त्यापैकी जाधव याने ‘मी पोलिस आहे, तुझ्या घरी फोन लाव’ असे धमकावून सांगितले. त्यानुसार सनीने आईला फोन लावल्यावर घाबरलेल्या आईने, ‘आमच्याकडे इतके पैसे नाहीत, मी पैसे कोठून आणू’ असे सांगताच त्यांनी फोन कट केला आणि पोलार्डने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल

तेथून त्यांनी सातमाने, रावळगाव, लखमापूरमार्गे घेऊन येताना सनीला मारहाण करून दमही दिला. यावेळी त्यांनी ‘तुला दोन लाख रुपये तरी द्यावेच लागतील’ असे सांगून लगेच पैसे देण्यास घरच्यांना सांग असा दम दिला. त्यामुळे आईला फोन करून माझ्या बँक खात्यावर तत्काळ वीस हजार रुपये टाकण्यास सांगितले. यानंतर शहरातील मालेगाव रस्त्यावरील स्टेट बँकेच्या एटीएममधून वीस हजार रुपये काढून जयेश जाधव याला दिले. रात्री साडेआठ वाजता त्यांनी सनीला भाक्षी रस्त्यावरील नव्याने झालेल्या रिंग रोड परिसरात सोडले आणि ‘उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत उर्वरित 1 लाख 80 हजार रुपये आणून दे, नाहीतर तुला बघून घेऊ’ असा दम देऊन फरार झाले. घरी कसाबसा पोहोचल्यावर घरच्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तत्काळ पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी गुन्हा दाखल करून विकी गुर्जर व जयेश जाधव या दोघा संशयिताना अटक केली आहे. त्यांना सटाणा न्यायालयासमोर उभे केले असता दोघांना शनिवार (ता.10) पर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर उर्वरित दोघे संशयित फरारी असून त्यांचा शोध सुरू असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth kidnapped for ransom pretending to be police nashik marathi news